Sangli: आटपाडीत धर्मांतराच्या संशयावरून मुंबईतील कुटुंबास पकडले, तिघांना दिले पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 04:07 PM2023-06-20T16:07:32+5:302023-06-20T16:08:21+5:30
या प्रकाराने पुन्हा एखादा असंतोष पसरला
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने महिलांना एकत्रित करून एका विशिष्ट धर्माची प्रार्थना म्हणण्यास लावण्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. हा प्रकार म्हणजे धर्मांतर करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी मुंबईहून आलेल्या कुटुंबातील तिघांना पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले.
देशमुखवाडी येथे साेमवारी हा प्रकार सुरू हाेता. याची माहिती मिळताच गावातील युवकांनी एकत्रित येत धर्मांतर करण्यासाठी आलेल्या मुंबई येथील कुटुंबास जाब विचारला. यावेळी मोठा जमाव जमला होता. या कुटुंबाची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे विशिष्ट धर्माचे साहित्य सापडले. एक महिला, एक मुलगी व एक पुरुष असे तिघे देशमुखवाडी येथील महिलांना वेगवेगळ्या कारणासाठी बोलावून घेत त्यांना विशिष्ट धर्माच्या गोष्टी सांगत प्रार्थना म्हणण्यास भाग पाडत हाेते. ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून आटपाडी पाेलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, आटपाडीमध्ये काही महिन्यांपूर्वी एका दवाखान्यामध्ये मंत्र व प्रार्थना म्हणून रुग्णांना बरे करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाही धर्मांतराचा मुद्दा गाजला होता. आटपाडीमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला होता. विधानसभा व विधान परिषदेतही याचे पडसाद उमटले होते.
यानंतर देशमुखवाडी मध्ये घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एखादा असंतोष पसरला आहे. देशमुखवाडी येथे आलेल्या संबंधित कुटुंबाला जमावाने आटपाडी पोलिसांच्या हवाली केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.