शंभराव्या नाट्यसंमेलनाची सांगलीची संधी मुंबईने हिरावली
By संतोष भिसे | Published: October 2, 2023 11:58 AM2023-10-02T11:58:08+5:302023-10-02T12:32:43+5:30
सांगलीकरांचा सहभाग पाहुण्या कलाकारापुरताच
संतोष भिसे
सांगली : शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाची सांगलीची संधी मुंबईने हिरावून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नाट्यपरिषदेचे तहयात विश्वस्त व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संमेलनाचा मुख्य कार्यक्रम मुंबईत घेण्याची सूचना केली आहे; त्यामुळे सांगलीकरांचा सहभाग फक्त पाहुण्या कलाकारापुरताच मर्यादित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबईत नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत पवार यांनी संमेलनाचा मुख्य कार्यक्रम मुंबईसारख्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावा, अशी सूचना केली. यानिमित्ताने शंभराव्या संमेलनाला साजेसे कार्यक्रम मुंबईत घेता येऊ शकतील, असेही ते म्हणाले. पवार यांची सूचना परिषदेकडून डावलली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुख्य संमेलन मुंबईतच होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनाची नाट्यप्रेमींना तीन वर्षांपासून प्रतीक्षा आहे. कोरोनाकाळात तीन वर्षे ते झाले नव्हते. त्यानंतर परिषदेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांमधील लाथाळ्यांमुळेही लांबले होते. निवडणुकीनंतर प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली नियामक मंडळ सत्तेत आले पण आता पावसाळा, दसरा-दिवाळी व शाळा-महाविद्यालयांचा परीक्षांचा काळ याचा विचार करून पुढील वर्षी मार्चमध्ये संमेलन घेण्याचे नियोजन आहे. कोरोनापूर्वीच्या काळात झालेल्या निवडीनुसार डॉ. जब्बार पटेल हेच अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाची रूपरेषा आखण्यासाठी समन्वय समिती स्थापना करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम नसतील
यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांनी तंजावरसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सांगलीत मुख्य सोहळा निश्चित केला होता. नव्या नियामक मंडळाने मात्र विभागनिहाय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘नाट्यपंढरी’ म्हणून सांगलीत मात्र एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकेल. अर्थात, त्यामध्ये सांगलीकर पाहुणे कलाकारच असतील.
बोरिवलीदेखील शर्यतीत
शंभरावे नाट्यसंमेलन बोरिवलीमध्ये व्हावे, अशी मागणी परिषदेच्या बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. अध्यक्ष प्रशांत दामले यांना तसे पत्र दिले. बोरिवली शाखा गेली ३० वर्षे सांस्कृतिक उपक्रमांत अग्रेसर असल्याने संधी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.