मुंबई पोलिसांची बंद घरे फोडली!
By Admin | Published: July 23, 2016 12:02 AM2016-07-23T00:02:39+5:302016-07-23T00:07:56+5:30
बोपेगावमध्ये अकरा घरफोड्या : घरमालक परगावी असल्याने चोरीची रक्कम अस्पष्ट
कवठे : मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गावाकडील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. वाई तालुक्यातील बोपेगाव येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत अकरा बंद घरे फोडली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. यापैकी बहुतांश घरमालक मुंबई पोलिसांत कार्यरत आहेत.
बोपेगाव येथे शुक्रवारी रात्री अकरा घरे चोरट्यांनी पाळत ठेवून फोडली. त्यातील नऊ घरमालक मुंबई व एक सातारा येथे नोकरीस असल्याने चोरीला गेलेल्या ऐवजाची रक्कम समजू शकली नाही.
शामराव जाधव यांचे बंधू राजेंद्र तसेच आनंदराव जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव हेसुद्धा मुंबई पोलिस दलात अधिकारी आहेत. संजय जाधव, कैलास कीर्दत, सुभाष कीर्दत, सुधीर जाधव, बाळासाहेब जाधव व हेमंत तरडे हेही मुंबई येथे नोकरीनिमित्त असून, यांच्याही घरातील कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, हे समजू शकले नाही.
सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार, डी. एच. पावरा व एल. बी. डोंबाळे तपास करत आहेत. (वार्ताहर)
तीन घरे अधिकाऱ्यांची
चोरी झालेल्यांमध्ये राजेंद्र जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव हे पोलिस उपनिरीक्षक आहेत. तर इतर तीन पोलिस असे सात पोलिसांची घरे फोडली आहेत.
रक्ताचे डाग अन् टिकाव
शिवाजी जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला. त्यामध्ये त्यांना यश आले नाही. आनंदराव जाधव यांच्या घरी रक्ताचे डाग व इतर घरांजवळ चोरीत वापरलेले टिकाव व चपला आढळले.
बंद घरांची दारे व कुलपे उघडलेल्या अवस्थेत समजल्यानंतर पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या दिवशी दुपारी दोन अनोळखी पुरुष व महिला गावातून फिरताना ग्रामस्थांनी पहिले असून, त्यांच्यावर आमचा संशय आहे.
- राजेंद्र शिंदे, पोलिस पाटील, बोपेगाव
रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा बराच वेळ आवाज येत असताना माझ्या घराची कडी काढत असल्याचा आवाज आला. त्यामुळे मी ‘कोण आहे’ म्हणून आवाज दिला. त्यानंतर चोर घरापासून निघून गेले.
- विलास जाधव, ग्रामस्थ, बोपेगाव