मुंबई-पुण्यातील कोरोना फैलावाचा धसका, रेल्वे तिकिटांचे कॅन्सलेशन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:28 AM2021-04-23T04:28:03+5:302021-04-23T04:28:03+5:30
मिरज रेल्वे स्थानक लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेल्वे प्रवास रद्द करण्याचे ...
मिरज रेल्वे स्थानक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेल्वे प्रवास रद्द करण्याचे प्रमाण वाढत आहे. सांगली व मिरजेतून दररोज सरासरी ४० तिकिटे रद्द केली जात आहेत. यामुळे रेल्वेची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामान्यत: एक ते दोन महिने अगोदर रेल्वेचे आरक्षण प्रवासी करतात. यंदा जानेवारीमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रेल्वेचे आरक्षणही वाढले. पण, फेब्रुवारीनंतर रुग्ण हळूहळू वाढू लागले. त्याचा परिणाम रेल्वेची तिकिटे रद्द करण्यामध्ये झाला. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण वाढले. लग्नसोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध आणले, त्यामुळेही प्रवाशांनी आरक्षण रद्द करण्याचा सपाटा लावला. अनेक कुटुंबांनी विवाहसोहळे पुढे ढकलले, त्यामुळेही प्रवास रद्द करण्याचे प्रमाण वाढले.
दिल्ली, राजस्थान, गुजरात यासह मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या सांगली-मिरजेत जास्त आहे. गेल्या महिन्याभरात या राज्यांत व शहरांत कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे प्रवाशांनीही प्रवासाकडे पाठ फिरविली. सांगली-मिरजेत सध्या दररोज सरासरी ४० तिकिटे रद्द केली जात आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर तसेच ऑनलाइन स्वरूपात रद्द केली जात आहेत. प्रक्रिया शुल्क वजा करून उर्वरित पैसे प्रवाशांना परत दिले जात आहेत. कर्नाटकसह काही राज्यांत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे, त्यामुळेही प्रवाशांनी प्रवास लांबणीवर टाकले. मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशाकडे चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र मागितले जात आहे, त्यामुळेही प्रवाशांत धास्ती आहे.
चौकट
मुंबई, दिल्ली, पुणे, राजस्थान, गुजरातच्या गाड्या रिकाम्या
- मुंबई, दिल्ली, पुणे, राजस्थान, गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. या गाड्या रिकाम्या धावताहेत. दक्षिणेकडून गुजरात व राजस्थानला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना विशेष गर्दी नाही.
- दिल्लीकडे जाणारी गोवा-निजामुद्दीन गाडीदेखील रिकामी धावत आहे. वास्कोला जाणारी गोवा एक्स्प्रेस थोड्या प्रमाणात गजबजलेली दिसते. म्हैसूर-अजमेर, यशवंतपूर-जोधपूर, बेंगलुरू-गांधीधाम या गाड्यांचे स्लिपर, वातानुकूलित कोच जेमतेम भरताहेत.
- मुंबईकडून येणारे प्रवासी वाढताहेत, पण जाण्यासाठी गर्दी नाही. पुण्याची स्थितीही अशीच आहे. हुबळी-दादर, कोल्हापूर-गोंदिया, कोल्हापूर-तिरुपती या मार्गावरील गाड्यांनाची प्रवासी नसल्याचा फटका बसतोय.
चौकट
उत्तरेकडे धावणाऱ्या गाड्या रिकाम्याच
कोरोना काळात नेहमीच्या काही एक्स्प्रेस रेल्वेने ‘विशेष कोविड एक्स्प्रेस’ म्हणून सोडल्या. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत त्यांना प्रवासी होते. मार्चनंतर घसरण सुरू झाली. गुजरात, राजस्थान आणि दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांत आरक्षण मिळेपर्यंत दमछाक व्हायची. या गाड्यांना सध्या सहज आरक्षण मिळते. महाराष्ट्र, हरिप्रिया, महालक्ष्मी, गांधीधाम, गोवा-निजामुद्दीन या गाड्या बारा महिने हाऊसफुल्ल असायच्या, त्यांनाही प्रवासी नाहीत. परीक्षा संपल्यानंतर प्रवासासाठी बाहेर पडण्याचे नियोजन अनेक कुटुंबे करतात. या वर्षी दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या, तरी ही कुटुंबे प्रवासाच्या मन:स्थितीत नाहीत. काही कुटुंबांनी एप्रिल, मे महिन्याची आरक्षणे केली होती, ती रद्द केली जात आहेत. देशभरातच कोरोनाचा उद्रेक असल्याने जायचे कोठे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
पॉइंटर्स
- रोज रेल्वेतून प्रवाशांची संख्या - ५५००
- दररोज जाणाऱ्या रेल्वे - ११
- आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या - सरासरी ४०
कोट
प्रवाशांची संख्या जास्त नाही. दररोज सरासरी अडीचशे आरक्षणे होतात. लांब पल्ल्याच्या गाड्या रिकाम्याच धावताहेत. गाड्यांची संख्याही कमी आहे. कोरोनामुळे लांब पल्ल्याचे प्रवासी कमी झाले आहेत.
- व्ही. पन्नीरसेल्वम, स्थानक अधीक्षक, मिरज.