मुंबईच्या ‘त्या’ मुलाचा कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:09 PM2019-04-28T23:09:01+5:302019-04-28T23:09:08+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर येथील नातेवाईकांकडे देवीची यात्रा करण्यासाठी मुंबईहून आलेल्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा ...
इस्लामपूर : इस्लामपूर येथील नातेवाईकांकडे देवीची यात्रा करण्यासाठी मुंबईहून आलेल्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीच्या बंधारा परिसरातील पाण्यात तिसऱ्या दिवशी सापडला. त्यामुळे त्याचे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. रोहित रामकुमार यादव (वय १७, रा. सायन, कोळीवाडा, मुंबई) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत सुनील बाबू कुचीवाले (रा. माकडवाले गल्ली, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिसांत वर्दी दिली आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता सुनील कुचीवाले यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी असे ५० ते ६० जण देवीची यात्रा करून परडी सोडण्यासाठी बोरगाव येथील कृष्णा नदीच्या बंधाºयाजवळ गेले. त्यावेळी रोहित हा त्यांच्यासोबत होता. नदीपात्रात अंघोळ करून सर्वांनी जेवण केले. देवीची परडी सोडून सर्वजण दुपारी चारच्या सुमारास इस्लामपूरला परतले. त्यावेळी रोहित सोबत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. यानंतर कुचीवाले कुटुंबीयांनी तातडीने नदी परिसरात धाव घेत, नदीपात्र आणि बंधारा परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे रात्री उशिरा सुनील कुचीवाले यांनी, रोहितला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पोलिसात दिली होती.
घटनेनंतर रविवारी तिसºयादिवशी सकाळी सातच्या सुमारास नदीपात्रात परडी सोडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच रोहितचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना निदर्शनास आला. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा हा मृतदेह रोहितचाच असल्याचे सुनील कुचीवाले यांनी ओळखले. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी सहायक उपनिरीक्षक ए. पी. पाटील अधिक तपास करत आहेत.
यात्रेसाठी इस्लामपूरला
इस्लामपूर येथील कुचीवाले कुटुंबाची तीन वर्षातून एकदा मरिअम्मा देवीची यात्रा असते. या यात्रेसाठी कुचीवाले कुटुंबीयांचा नातेवाईक असलेला रोहित मुंबईहून आला होता.