महापालिका क्षेत्र पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:28+5:302021-05-06T04:29:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्र पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला आहे. यापूर्वी ठेकेदारांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्र पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला आहे. यापूर्वी ठेकेदारांकडून पॅचवर्कचे काम केले जात होते. पण पहिल्यांदाच ठेकेदारीला दणका देत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात दरवर्षी पॅचवर्कची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी जवळपास एक कोटीहून अधिक रुपयाचा निधी खर्च होतो. पॅचवर्कसाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत काम केले जाते. त्यात कामाच्या दर्जाबाबत अनेकदा तक्रारी होतात. पहिल्याच पावसाळ्यात पॅचवर्क निघून जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पॅचवर्क करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या खरेदीचे आदेश बांधकाम विभागाला दिले. बांधकाम विभागाने रोलर, डोझर, ट्रॅक्टर व इतर सामुग्री खरेदी केली आहे.
पॅचवर्कसाठी मजूर घेतले आहेत. महापालिकेनेच स्वत:ची यंत्रणा उभारुन खड्डेमुक्तीचा संकल्प केला आहे. या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. शहरातील आंबा भवन ते इदगाह या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. सांगली व मिरजसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून पावसाळ्यापूर्वी ही शहरे खड्डेमुक्त केली जातील, असे अभियंता आप्पा हलकुडे यांनी सांगितले.
कोट
महापालिका क्षेत्रातील पॅचवर्कच्या कामाबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यामुळे डिपार्टमेंटल पॅचवर्क करण्याचा निर्णय घेतला. यंत्रणा वर्षभर कार्यान्वित राहणार असल्याने खड्ड्यांचा प्रश्न निकाली निघेल. सांगली-मिरजेसाठी दोन स्वतंत्र युनिट तयार केली आहेत. केवळ पावसाळ्यापुरतेच पॅचवर्कचे काम होणार नसून, ते वर्षभर सुरू राहणार आहे.
- नितीन कापडणीस, आयुक्त