मिरजेत महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण -: पिता-पुत्राला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:10 PM2019-08-01T23:10:52+5:302019-08-01T23:18:44+5:30
मिरजेत माधव थिएटरजवळ रिगल चौकात हत्तीवाले मशिदीलगत असलेल्या सात दुकानगाळ्यांच्या जुन्या बांधकामास महापालिकेने पाडण्याची नोटीस बजावली होती. मात्र
मिरज : मिरजेत मटण मार्केट परिसरातील जुने दुकानगाळे पाडण्यास विरोध करून महापालिका सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण व जेसीबीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसात अमिर आलमगिर काझी (वय २५) व आलमगिर अब्दुल काझी (४५, रा. नदीवेस मिरज) या पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
मिरजेत माधव थिएटरजवळ रिगल चौकात हत्तीवाले मशिदीलगत असलेल्या सात दुकानगाळ्यांच्या जुन्या बांधकामास महापालिकेने पाडण्याची नोटीस बजावली होती. मात्र भाडेकरूंचा वाद असल्याने महापालिकेच्या पथकाने गुरुवारी दुपारी जुने दुकानगाळे पाडण्याची कारवाई सुरू केली.
सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह अतिक्रमण पथकाचे कर्मचारी पाच दुकानगाळे जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना दुकानगाळे मालकांनी हरकत घेतल्याने महापालिका कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला.
दुकानगाळे पाडण्यास जोरदार विरोध करीत अमिर काझी, आलमगिर काझी या गाळाधारक पिता-पुत्राने सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, जेसीबी चालक विक्रम कोळी व महापालिका कर्मचारी विक्रम घाडगे यांना मारहाण करून जेसीबीवर दगडफेक केली. दगडफेकीत महापालिकेच्या जेसीबीचे दहा हजाराचे नुकसान झाले. यावेळी मोठा जमाव जमला होता.
कर्मचारी व सहायक आयुक्तांना मारहाण झाल्याने बांधकाम पाडण्याचे काम थांबविण्यात आले.
मारहाणप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात घोरपडे यांनी फिर्याद दिली असून शहर पोलिसांनी काझी पिता-पुत्रास शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अटक केली. मिरजेत पोलीस बंदोबस्ताशिवाय अतिक्रमण काढण्यास जाणाºया महापालिका अधिकारी व कर्मचाºयांना वारंवार मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. दीड महिन्यापूर्वी मालगाव रस्त्यावर झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावरही दगडफेक करून पिटाळून लावण्यात आले होते.