महापालिकेच्या जन्म-मृत्यूचे दाखले एका क्लीकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:01+5:302021-06-09T04:33:01+5:30
सांगली : जन्म-मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारण्याची आता गरजच उरलेली नाही. एका क्लीकवर ऑनलाईन दाखले उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत ...
सांगली : जन्म-मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारण्याची आता गरजच उरलेली नाही. एका क्लीकवर ऑनलाईन दाखले उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत देश-विदेशासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अडीच हजारहून अधिक दाखले ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आले आहेत.
जन्म-मृत्यू कायद्यानुसार ज्याठिकाणी जन्म अथवा मृत्यू झाला, त्याठिकाणीच दाखला काढावा लागतो. शहरातील रुग्णालयात जन्म अथवा मृत्यू होणाऱ्यांची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत असते. परराज्य, परजिल्ह्यासह ग्रामीण भागातील लोकांना हे दाखले मिळविण्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. शिवाय शहरातील नागरिकांना सांगली अथवा मिरजेत दाखल्यासाठी जावे लागते. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आयुक्त नितीन कापडणीस यांनी ऑनलाईन दाखल्याची व्यवस्था करण्याची सूचना या विभागाला दिली होती. त्यानुसार दोन महिन्यापूर्वी जन्म-मृत्यूच्या सर्वच नोंदी संगणकावर घेण्यात आल्या. त्यामुळे आता घरी बसून हे दाखले नागरिकांच्या हाती मिळत आहेत.
याबाबत सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते म्हणाले की, आतापर्यंत अडीच हजार नागरिकांनी ऑनलाईन दाखले घेतले आहेत. यात देश-विदेशातील व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेतून काहींनी नातलगांचे दाखले काढले आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर क्लीक केल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यास तत्काळ दाखला मिळतो. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ व पैशाची मोठी बचत झाली आहे.