जत नगरपालिकेत नगरसेवकाला कानशिलात लगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:07 AM2019-01-11T00:07:55+5:302019-01-11T00:09:40+5:30
जत : विकासकामांसंदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांत झालेली चर्चा शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारीने गाजली. सत्ताधारी गटातील ...
जत : विकासकामांसंदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांत झालेली चर्चा शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारीने गाजली. सत्ताधारी गटातील नगरसेवकाने विरोधी गटातील नगरसेवकाला कानशिलात लगावली. यामुळे नगरपालिकेतील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण झाले. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.
यासंदर्भात जत पोलिसात कोणत्याही स्वरूपाची तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल झाली नाही. परंतु या घटनेची जत नगरपालिकेसह शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी गटातील काही नगरसेवक नगरपालिका सभागृहात बसले असता, विरोधी गटातील एक नगरसेवक तेथे आले व सत्ताधारी गटातील नगरसेवकांसोबत विकास कामासंदर्भात चर्चा करू लागले. सत्ताधारी गटातून माझी अडवणूक होऊ लागली आहे, असा त्यांनी आरोप केला. मात्र, सत्ताधारी गटाच्या माजी नगराध्यक्षांनी तुम्हीच विकास कामाला खो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे सांगितले. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपस्थित नगरसेवकांनी त्या विरोधी सदस्यास समजावून सांगून परत पाठवले.
या प्रकारानंतर विरोधी नगरसेवकाने त्यांच्या गटातील नगरसेवकांना बोलावून घेतले. ते सर्वजण नगरपालिका सभागृहात आले. वाद मिटला असताना पुन्हा का आलात, असा जाब सत्ताधारी नगरसेवकांनी विचारला. यावरून पुन्हा वाद झाला आणि सत्ताधारी नगरसेवकाने विरोधी नगरसेवकांच्या कानशिलात लगावली. यामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले.
विरोधकांनी भूमिका बदलावी : बन्नेनवार
काही विरोधी नगरसेवक ठेकेदारांना हाताशी धरून विकासकामांना खो घालण्यासाठी कमी दराने निविदा भरत आहेत. तसेच न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची भूमिका ही सामंजस्याची आहे. विरोधकांना सहकार्य करत आहोत. त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा, असे मत नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार व उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले.