लग्नाचा बार उडाल्यानंतर महापालिकेचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:22+5:302021-07-19T04:18:22+5:30
फोटो : १८ शीतल ०२ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले असतानाही नियमांना पायदळी ...
फोटो : १८ शीतल ०२
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले असतानाही नियमांना पायदळी तुडवीत विवाह सोहळा करणाऱ्यांना रविवारी महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने दणका दिला. सांगलीतील दोन व मिरजेतील एका मंगल कार्यालयाकडून ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात १९ जुलैअखेर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात संसर्ग अधिक असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्यासह महापालिकेची पथके रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. जिल्हा प्रशासनाने विवाह सोहळ्यासाठी ५० लोकांनाच परवानगी दिली आहे. तरीही नियमांना पायदळी तुडवीत शहरात लोकांची गर्दी जमवून लग्नाचा बार उडवून दिला जात आहे.
सहायक आयुक्त सावता खरात, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, स्वच्छता निरीक्षक धनजंय कांबळे, पंकज गोंधळे, प्रमोद कांबळे यांच्या पथकाला सांगलीवाडीतील दोन मंगल कार्यालयांत गर्दी जमवून विवाह समारंभ सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दोन्ही मंगल कार्यालयांची पाहणी केली असता ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. या दोन्ही मंगल कार्यालयाला प्रत्येकी १५ हजारांचा दंड करण्यात आला.
मिरजेत सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक मेघना कांबळे यांच्या पथकाने शाही दरबार हाॅल येथे तपासणी केली असता सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. त्याबद्दल दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.