कामचुकार कर्मचाऱ्यांना महापालिकेचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:31 AM2021-08-21T04:31:26+5:302021-08-21T04:31:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्त व उपायुक्तांनी चांगलाच दणका दिला. या कर्मचाऱ्याने एक दिवस रजेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्त व उपायुक्तांनी चांगलाच दणका दिला. या कर्मचाऱ्याने एक दिवस रजेचा अर्ज देऊन दांडी मारली होती शिवाय सफाईकामातही कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. अनिकेत गोंधळे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. महापुरानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे हे शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करत होते. सिद्धार्थनगर परिसरात गोंधळे हा थांबला होता. यावेळी त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबईचे पथक स्वच्छतेसाठी कधी येणार, अशी विचारणा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला काय काम करता, असे विचारला असता त्याने महापालिकेकडे कायम कर्मचारी असल्याचे सांगितले. सफाई कर्मचारी असताना तो स्वच्छतेच्या कामात कामचुकारपणा करत होता तसेच त्याने एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज दिला होता. रजा संपल्यानंतरही तो कामावर हजर झाला नाही. घराच्या स्वच्छतेसाठी थांबल्याचे खोटेनाटे सांगून कामात हयगय केल्याचा ठपका आरोग्य विभागाने ठेवला. त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त रोकडे यांनी सांगितले.
चौकट
कामात हयगय नको : रोकडे
महापालिकेच्या सफाई कामगारांनी पुराच्या काळात चांगले काम केले. त्यांचे प्रशासनासह शासनाकडूनही कौतुक झाले पण काही कर्मचारी मात्र कामचुकारपणा करत आहेत. कामात हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिला आहे.