महापालिकेने चिल्ड्रन कोविड सेंटर उभे करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:44+5:302021-06-24T04:19:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची तिसरी लाट आता महाराष्ट्रात येत आहे. लहान मुलांसाठी ती अधिक धोकादायक असल्याचे म्हटले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाची तिसरी लाट आता महाराष्ट्रात येत आहे. लहान मुलांसाठी ती अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महापालिकेने चिल्ड्रन कोविड सेंटर तातडीने उभे करावे, अशी मागणी शिवसेनेकडून बुधवारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्त नितीन कापडणीस व महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना याविषयीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, सांगली महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र कोरोना चिल्ड्रन हॉस्पिटल उभे करावे. हे हॉस्पिटल एक हजार बेडचे असावे. महापालिका सध्या ७५ लाख रुपये खर्च करुन ऑक्सिजन प्लांट उभा करत आहे. यातून १२५ सिलिंडरची निर्मिती होणार आहे, पण तिसऱ्या लाटेचे गांभीर्य ओळखून ५०० सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती करावी.
जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी एक लाख रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करून ठेवल्यास भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सांगलीकर जनतेला मुकाबला करणे सोपे होणार आहे. गंभीर रुग्णांचा जीव यामुळे वाचणार आहे. यावेळी जितेंद्र शहा, माधवनगरचे उपसरपंच बाळासाहेब मगदूम, अनिल शेटे, पंडितराव बोराडे, रावसाहेब घेवारे, लक्ष्मण वडर, सचिन नागरे, आदी उपस्थित होते.