पालिकेची वीस कोटींची कामे लटकली

By admin | Published: June 19, 2015 12:07 AM2015-06-19T00:07:47+5:302015-06-19T00:22:27+5:30

आर्थिक अडचण : नगरसेवकांत अस्वस्थता; दोन महिने फायलींवर सह्या न करण्याचा निर्णय

The municipal corporation's 20 crore works | पालिकेची वीस कोटींची कामे लटकली

पालिकेची वीस कोटींची कामे लटकली

Next

सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील २० कोटींच्या विकासकामांची निविदा मागवूनही त्या उघडण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविल्याने नगरसेवकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आयुक्त अजिज कारचे यांनी आर्थिक अडचणीचे कारण पुढे करीत पुढील दोन महिने कोणत्याही फायलीवर सह्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी शनिवारी होणाऱ्या महासभेत नगरसेवकांकडून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.
महापालिकेच्या जनरल फंडातून नगरसेवकांना प्रत्येक २५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, पण वर्षभरात एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी कराची वसुली समाधानकारक न झाल्याने या तरतुदीतून कामे करण्यास प्रशासनाने आखडता हात घेतला होता. अखेर स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांनी नगरसेवकांकडून जनरल फंडातील कामे मागवून घेतली. प्रत्येक नगरसेवकाने प्रभागातील गटारी, रस्ते डांबरीकरण, मुरूमीकरण, खडीकरणासह विविध कामे सूचविले.
या कामांना स्थायी समितीने मान्यता देत निविदा काढण्याचे आदेश दिले. आयुक्त अजिज कारचे यांनीही कामाच्या निविदा काढण्यास मंजुरी दिली. बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी निविदेतील कागदपत्रांचा लिफाफा उघडला, पण दरासंदर्भातील निविदा उघडली नाही. बांधकाम विभागाला निविदा उघडण्यास प्रतिबंध केले. यासंदर्भात स्थायी समिती सभेत सुरेश आवटी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा शहर अभियंता सी. जी. सोनावणे यांनी आयुक्तांच्या आदेशामुळे निविदा उघडल्या नसल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन वारंवार विनंती केली. ठेकेदार शासकीय निधीतील कामे करीत नाहीत, तिथे जनरल फंडातील कामे तातडीने करणार नाहीत. त्यासाठी निविदा उघडून ठेकेदारांना समज द्यावा. कामे सुरू होण्यास तीन ते चार महिने लागतील. पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरणाचे कामे थांबून इतर कामांना सुरुवात करता येईल, असा नगरसेवकांचा सूर होता, पण आयुक्तांनी आर्थिक स्थितीचे कारण पुढे करीत येत्या दोन महिन्यांत कोणत्याही फाईलवर सह्या न करण्याचा निर्धार केल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
या कामासंदर्भात नगरसेवकांना नागरिकांतून विचारणा होत आहेत. गटार, ड्रेनेज, मुरुमीकरण अशी कामे असल्याने किमान नागरिकांना कामे सुरु होतील, असे सांगण्याइतपत कार्यवाही व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. पण आयुक्तांनी कठोर भूमिका घेतल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या महासभेत आयुक्तांना याप्रश्नी जाब विचारण्याचा निर्धारही नगरसेवकांनी केला आहे. (प्रतिनिधी)

अंदाजपत्रकामुळे अडले
२० कोटींची कामे चालू अंदाजपत्रकातील आहेत. त्याला मार्च महिन्यात मंजुरी देण्यात आली होती. पण महासभेत अंदाजपत्रक मंजूर झालेले नव्हते. चालू वर्षाचे अंदाजपत्रक नुकतेच महापौर विवेक कांबळे यांनी प्रशासनकडे दिले आहे. त्यामुळे तीन महिने निविदा उघडण्यात आलेल्या नव्हत्या. अंदाजपत्रक आल्यानंतर या कामांच्या निविदा उघडून मान्यता घेतली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: The municipal corporation's 20 crore works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.