महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांची पुनर्रचना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:29 AM2021-03-23T04:29:20+5:302021-03-23T04:29:20+5:30

सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर आता काँग्रेस व राष्ट्रवादीने चार प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. चारही प्रभाग ...

Municipal Corporation's four ward committees will be reconstituted | महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांची पुनर्रचना होणार

महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांची पुनर्रचना होणार

Next

सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर आता काँग्रेस व राष्ट्रवादीने चार प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. चारही प्रभाग समित्यांच्या पुनर्रचना करून भाजपला शह देण्याची तयारी आघाडीने केली आहे. तसा विषय शुक्रवारी होणाऱ्या विशेष महासभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे.

महापालिकेत २०१८ साली भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. यात जास्तीत जास्त प्रभाग समित्या भाजपच्या ताब्यात राहतील, याची दक्षता घेतली गेली. गेली अडीच वर्षे चारपैकी तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे तर एका प्रभाग समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आता या प्रभाग समितीच्या सभापतीपदावरही आघाडीच्या नगरसेवकांची वर्णी लागावी, यासाठी दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत.

येत्या शुक्रवारी महापालिकेची विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. महापौर, उपमहापौर निवडीनंतर ही पहिलीच सभा होत आहे. ही सभाही ऑनलाइन होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा विषय घेण्यात आला आहे. प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून भाजपच्या हातून सभापतीपद काढून घेण्याची खेळी आघाडीने आखली आहे. त्यावर शुक्रवारी सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय गुंठेवारी भागातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी नव्याने गुंठेवारी समिती स्थापन करण्याचा विषय सभेत चर्चेला घेण्यात आला आहे.

चौकट

सर्वच प्रभाग समित्या आघाडीकडे

चार प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून जास्तीज जास्त समित्यावर आघाडीचे वर्चस्व राहील, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यात प्रभाग समिती एक, दोन व चार या तीन समित्यांवर भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आहे. तर कुपवाड समितीत भाजप व आघाडीचे समसमान सदस्य संख्या करण्यात येणार आहे. तिथे चिठ्ठीवर सभापती निवड होईल, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील कारभाऱ्यांनी पुनर्रचनेचे नियोजन केल्याची चर्चा आहे.

Web Title: Municipal Corporation's four ward committees will be reconstituted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.