महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:48+5:302021-06-18T04:19:48+5:30
सांगली : पावसाचा जोर वाढल्यामुळे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वच विभागांना सज्ज ...
सांगली : पावसाचा जोर वाढल्यामुळे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वच विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पूरपट्ट्यात आपत्कालीन यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.
कापडणीस यांनी गुरुवारी शहरातील पूरपट्ट्यातील अनेक भागांत भेटी देऊन पाहणी केली. सांगली आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी १९ फुटावर पोहोचली असल्याने प्रशासनाने पूर पट्ट्यातील लोकांना अलर्ट करण्याचे काम सुरू केले आहे. पूर पट्ट्यातील मालमत्ताधारकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सांगली आणि मिरजेच्या कृष्णा नदीच्या घाटावर अग्निशमन विभागाकडून पाणीपातळीवर नजर ठेवली जात आहे. उपायुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील यांच्या देखरेखीखाली आपत्ती निवारण कक्ष सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून कृष्णा नदीच्या पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नागरिकांनी आपल्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.