कुपवाडला महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्ताकंडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:20+5:302021-03-18T04:26:20+5:30

कुपवाड : शहरातील प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी दुपारी झाडाझडती घेतली. ...

Municipal employees of Kupwad were attacked by the commissioner | कुपवाडला महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्ताकंडून झाडाझडती

कुपवाडला महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्ताकंडून झाडाझडती

Next

कुपवाड : शहरातील प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी दुपारी झाडाझडती घेतली. नागरिकांशी उद्धटपणा खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट करून आयुक्त कापडणीस यांनी सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांना हालचाल रजिस्टरची दिवसातून दोन वेळा तपासणी करण्याबरोबरच बेशिस्तांवर कारवाईचे आदेश दिले.

कुपवाड शहर प्रभाग समिती ३ मधील विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात विद्युत साहित्य उपलब्ध नाही, असे सांगून उद्धट उत्तरे देत होते. नागरिकांचे फोन उचलत नाहीत. रस्त्यावरील बंद असलेल्या पथदिव्यांची देखभाल-दुरुस्ती करीत नव्हते. कामावर वेळेवर येत नव्हते. पाणीपट्टी, घरपट्टी, आरोग्य विभाग, नगररचना, बांधकाम विभाग, अशा विविध विभागांविरोधातही नगरसेवक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आयुक्तांकडे तक्रारीचा पाढा वाचला होता.

त्यानुसार आयुक्त कापडणीस यांनी बुधवारी दुपारी कुपवाड कार्यालयास अचानक भेट देऊन उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

आयुक्त कापडणीस यांनी सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांना कुपवाड कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हालचाल रजिस्टरची दिवसातून किमान दोन वेळा तपासणी करावी, बेशिस्तांवर कारवाई करावी असे आदेश दिले. गायकवाड यांना कुपवाड प्रभागातील पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी सोपविली असून, समस्यांचा निपटारा करण्याचे अधिकार दिले आहेत.

कुपवाड शहरासह विस्तारित परिसरासाठी उद्यान व मैदान विकसित करण्याबाबतचे नियोजन केले आहे.

कुपवाड व परिसरात अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभारणार आहे. पुढील आठवड्यापासून पावसाळापूर्व नालेसफाई सुरू केली जाणार असल्याची माहितीही कापडणीस यांनी दिली. येत्या दोन महिन्यांत रस्त्यावर एल.ई.डी.चे पथदिवे बसवून शहर प्रकाशमय करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

चौकट :

कुपवाडमध्ये अतिक्रमण हटाव

शहरातील फुटपाथवर व मुख्य रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे व महापालिका अधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आदेश आयुक्तांनी सहायक आयुक्तांना दिले. पोलीस व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात अतिक्रमण मोहीम राबविणार आहे. जे व्यावसायिक अतिक्रमणे काढणार नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.

Web Title: Municipal employees of Kupwad were attacked by the commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.