महापालिकेचा अग्निशमन विभागच संकटात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:21 PM2019-12-13T14:21:57+5:302019-12-13T14:22:18+5:30
सांगली शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही. कारण अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. गेल्या पंधरा वर्षात या विभागाच्या सक्षमीकरणाची चर्चा अधिक झाली, पण एकाही सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक्तांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.
शीतल पाटील
सांगली : शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही. कारण अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. गेल्या पंधरा वर्षात या विभागाच्या सक्षमीकरणाची चर्चा अधिक झाली, पण एकाही सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक्तांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, त्यावर एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी, अशी सर्वसाधारण रचना अग्निशमन दलाची आहे. पण सांगलीचा विचार करता, शासनाच्या आदर्श नियमावलीलाही लाजवेल, अशी स्थिती आहे.
सात अग्निशमन बंब, चार ते पाच शववाहिका, त्यावर काम करणारे चाळीसभर कर्मचारी, अशा कमकुवत आधारावर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम या विभागाला करावे लागत आहे. सध्या महापालिकेकडे ११ कायम फायरमन, दोन लिडिंग फायरमन, ५ क्लिनर, ५ वाहनचालक असा ताफा आहे. तर मानधनावर ३८ चालक व फायरमन घेण्यात आले आहेत. एकूण ७१ जणांचा स्टाफ तीन शिफ्टमध्ये काम करीत आहे.
एका बंबामागे सहा कर्मचारी असे गणित घातले, तर एका शिफ्टसाठी किमान ४२ कर्मचाऱ्यांची, तर तीन शिफ्टसाठी १२६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा विचार करता, आणखी २० ते ३० कर्मचाऱ्यांची या विभागाला गरज आहे. पण गेल्या पंधरा वर्षात या विभागात भरती प्रक्रियाच झालेली नाही.
काही कर्मचाऱ्यांना तर आरोग्य व इतर विभागाकडे कामाला पाठविले जाते. आस्थापनेवरील काही कर्मचारी तर कायम गैरहजर असतात. त्यामुळे या विभागाला उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांवरच नागरिकांना सेवा देण्याची कसरत करावी लागते.