महापालिकेतील गुरूच्या चेल्यांना धोबीपछाड

By admin | Published: April 17, 2016 10:51 PM2016-04-17T22:51:24+5:302016-04-18T00:24:31+5:30

प्रभाग समिती सभापती निवडी : नव्या समीकरणाची जुळवाजुळव; उपमहापौर गट पिछाडीवर

In the municipal guru's chest, wash-up | महापालिकेतील गुरूच्या चेल्यांना धोबीपछाड

महापालिकेतील गुरूच्या चेल्यांना धोबीपछाड

Next

शीतल पाटील-- सांगली -गुरू हा चेल्यांना कधीही सारे डाव शिकवित नाही, असे म्हटले जाते. त्याची प्रचिती महापालिकेच्या राजकारणात येऊ लागली आहे. शनिवारी प्रभाग सभापती निवडीच्या निमित्ताने रंगलेल्या काँग्रेसअंतर्गत नाट्यात मदन पाटील गटाने बाजी मारली. यामागे गटनेते किशोर जामदार यांचे राजकीय डावपेच कारणीभूत आहेत. जामदारांना गुरू मानणाऱ्या उपमहापौर गटाला त्यांच्या खेळीने धोबीपछाड व्हावे लागले.
काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेच्या राजकारणाची खिचडी झाली आहे. त्यांच्या पश्चात विशाल पाटील यांनी पालिकेच्या राजकारणात एन्ट्री करीत स्वतंत्र गट निर्माण केला. त्यांच्या सोबतीला माजी आमदार संभाजी पवार यांची स्वाभिमानी आघाडी धावली आहे. दोन्ही गटाचे संख्याबळ पालिकेच्या राजकारणात डोकेदुखी ठरेल इतके निश्चितच आहे. महापौर निवडीवेळी त्याचा अनुभव आहे. विशाल पाटील गटाने उपमहापौरपद पदरात पाडून घेतले.
या गटातील बहुतांश नगरसेवक गटनेते किशोर जामदार यांना राजकीय गुरू मानतात. तसे त्यांनी जाहीरपणेही सांगितले आहे. उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने यांच्या कारकीर्दीला जामदारांमुळेच वलय निर्माण झाले आहे. मदनभाऊंच्या पश्चात जामदार यांची भूमिका पालिकेत महत्त्वाची मानली जाते. सभागृह नेता, गटनेता या पदाची जबाबदारी सांभाळताना पदाधिकारी निवडीत जामदारांचा ‘व्हिप’ बरीच समीकरणे बदलून टाकतो.
पालिकेच्या पटावरील किशोर (कृष्ण) असलेल्या जामदारांचे वजन ज्यांच्या पारड्यात जाईल, त्याचे कोटकल्याण ठरलेले असते. म्हणूनच काँग्रेसमधील सारेच गट जामदारांना दुखविण्याच्या नादाला लागत नाहीत. खुद्द जामदार कोणत्या गटाचे?, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. पण सभापती निवडीच्या निमित्ताने जामदार यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभाग समिती सभापती निवडीत जामदार यांची खरी कसोटी होती. एकीकडे मदन पाटील गटाचा उपमहापौर गटाला सभापतीपद देण्यास छुपा विरोध होता, तर उपमहापौर गटाने चारही प्रभाग समितीवर दावा सांगितला होता. मदन पाटील गटातील एकही सदस्य सभापती पदासाठी इच्छुक नव्हता. या राजकीय खिचडीतून मार्ग काढत जामदारांनी आपल्या शिष्यांनाच ‘हात’ दाखविला. उपमहापौर गटासोबत असलेल्या स्वाभिमानीला एकीकडे चुचकारताना, दुसरीकडे राष्ट्रवादीसोबत आघाडीही केली. राष्ट्रवादीची साथ घेण्यास स्वाभिमानीचा जसा विरोध होता, तसाच तो उपमहापौर गटाचाही होता.
नेमकी हीच बाब जामदार यांच्या पथ्यावर पडली. मदन पाटील गट व राष्ट्रवादी एकत्र आल्यास सर्वच चार प्रभागात बहुमत होते. त्यामुळे विरोध करण्यातही अर्थच उरत नव्हता. परिणामी उपमहापौर गटाने निवडीतूनच माघार घेतली. याचा फायदा मदन पाटील गटाला झाला. केवळ एका प्रभाग समिती सभापतीवर समाधान मानणाऱ्या मदन पाटील गटाला तीन प्रभाग सभापती पदाची लॉटरी लागली, तर राष्ट्रवादीच्याही पारड्यात एक सभापतीपद गेले.
या राजकीय खेळीमागे केवळ किशोर जामदार यांची कूटनीतीच कारणीभूत ठरली. महापालिकेच्या राजकारणात त्रासदायक ठरू पाहत असलेल्या आपल्या शिष्यगण तथा उपमहापौर गटाला जामदार यांच्या डावपेचांनी छोबीपछाड व्हावे लागले आहे. या निवडीने पालिकेच्या राजकारणावरील जयश्रीताई पाटील यांची पकड आणखी घट्ट केली, असेच म्हणावे लागले.

शुक्लकाष्ठ अजूनही कायम
प्रभाग सभापती निवडीतून उपमहापौर गटाने माघार घेतली असली तरी, पालिकेच्या राजकारणात त्यांचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. लवकरच शिक्षण समितीची पुनर्रचना होणार आहे. शिक्षण समितीसह चार महिन्यानंतर होणाऱ्या स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीवेळीही उपमहापौर गट आक्रमक होऊ शकतो. या दोन्ही निवडीवेळी किशोर जामदार यांचीच भूमिका निर्णायक असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत पाटील यांचे वावडे
महापालिकेतील उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वावडे आहे. विशेषत: राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांची साथसंगत या दोन्ही गटाला नकोशी आहे. त्यामागे दोन्ही गटाचे भविष्यातील राजकारण आहे. सर्वोदय कारखान्यावरून जयंत पाटील व संभाजी पवार यांच्यात वितुष्ट आले आहे, तर कॉँग्रेसमध्ये नव्याने उदयास येऊ लागलेल्या विशाल पाटील गटालाही जयंत पाटीलविरोधक म्हणूनच आपली ओळख निर्माण करायची आहे. दुसरीकडे मदनभाऊंच्या पश्चात त्यांच्या गटाचे सूर जयंत पाटील यांच्याशी जुळले आहेत. त्यामुळे उपमहापौर गट व स्वाभिमानीच्या रडारवर जयंतरावांसोबतच मदनभाऊ गटही आहे.

उपमहापौर गटाने पालिकेतील गैरकारभाराला लगाम घालण्याचा विडा उचलला आहे. गैरकारभाराला पाठीशी न घालण्याच्या सूचना आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शी राहावी, अशी भूमिका आहे. प्रसंगी बाहेरून आर्थिक रसद पुरवू, पण पालिकेत चिरीमिरी घेऊ नये, अशी बंधने आहेत. त्यामुळेच या गटाने ऐनवेळचे ठराव, बीओटीला विरोधाची भूमिका घेतली आहे.

Web Title: In the municipal guru's chest, wash-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.