महापालिका सभेत सत्ताधारी बनले निर्लज्ज !

By Admin | Published: February 4, 2016 01:15 AM2016-02-04T01:15:42+5:302016-02-04T01:16:15+5:30

सभा तहकूब : मुरुड दुर्घटनेची मांडली थट्टा

In the municipal meeting, became a powerless party! | महापालिका सभेत सत्ताधारी बनले निर्लज्ज !

महापालिका सभेत सत्ताधारी बनले निर्लज्ज !

googlenewsNext

सांगली : महापालिकेच्या महासभेत बुधवारी सत्ताधारी काँग्रेसने महापौर विवेक कांबळे यांना शह देण्यासाठी अक्षरश: निर्लज्जपणाचा कळस केला. महासभा तहकूब करण्यासाठी थेट मुरुड येथील दुर्घटनेचे कारण देण्यात आले; पण या दुर्घटनेचा उल्लेखही हसत-खेळत करण्यात आल्याने, संतापाची लाट उसळली आहे. विरोधी राष्ट्रवादी व भाजपच्या सदस्यांनी या कृत्याबद्दल काँग्रेसचा निषेध केला. धनपाल खोत यांनी तर, सत्ताधाऱ्यांच्या वर्तनाने सांगलीची मान शरमेने खाली गेल्याची टीका केली.
महापौर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता महासभा सुरू झाली. कांबळे यांची ही शेवटची सभा असल्याने त्यांनी सुरुवातीलाच नगरसेवकांचे आभार मानले. महापौर म्हणून काम करताना सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी सहकार्य केले. मदनभाऊ पाटील यांनी महापालिकेचा विकास करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी भविष्यातही सर्वांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. महापौरांच्या आभार प्रदर्शनानंतर विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी, महासभा तहकूब करण्याची लेखी सूचना मांडली. नूतन महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात महासभा घेणे उचित ठरणार नाही. ही सभा तहकूब करून १० फेब्रुवारी रोजी घ्यावी, अशी मागणी केली. स्थायी समिती सभापती संतोष पाटील, शेखर माने यांनीही या मागणीस समर्थन दिले. महापौर कांबळे यांनी मात्र, कोरम पूर्ण असून विषयपत्रिकेवर केवळ तीनच विषय आहेत. त्यामुळे सभा सुरू करूया, मागील सभेचे इतिवृत्तही वाचण्यास हरकत नाही, असा पवित्रा घेतला. सभा तहकूब करण्यासाठी काहीतरी कारण हवे. सभा कशाला रद्द करता, अशी विनंतीही त्यांनी केली. पण त्याला इतर सदस्यांनी विरोध केला.
त्यातच गटनेते किशोर जामदार यांनीही सभा तहकूब करण्याचे समर्थन केले. मात्र ते करताना मुरूड येथे समुद्रात बुडून झालेल्या १४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण दिले. या दुर्घटनेत किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, हेही गटनेत्यांना आठवले नाही. इतर सदस्यांनी त्यांना त्याची आठवण करून दिली. हा सारा किळसवाणा प्रकार सभागृहात हसत-खेळत सुरू होता.
अखेर महापौरांनी सभा तहकूब केल्याचे सांगताच सर्वच पक्षाचे नगरसेवक उठून बाहेर जाऊ लागले. ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांनी सदस्यांना अडवत किमान मृत विद्यार्थ्यांना श्रद्धाजंली तरी वाहावी, असा आग्रह धरला. मग भानावर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळत श्रद्धांजली वाहिली. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी जाहीर निषेध केला आहे. महापौर कांबळे यांनी सभागृहातील कृत्याचे खापर गटनेत्यांवर फोडले आहे. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: In the municipal meeting, became a powerless party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.