महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याचा लवकरच राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 AM2021-08-19T04:30:53+5:302021-08-19T04:30:53+5:30
सांगली : महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या बदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. भाजपनंतर आता काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचा राजीनामा ...
सांगली : महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या बदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. भाजपनंतर आता काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीचे सदस्य निवडीनंतर त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवक करीम मेस्त्री यांच्या राजीनाम्याबाबतही पक्षातून आग्रह आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती. या आघाडीला धूळ चारत भाजपने सत्ता काबीज केली. आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक २० जागा मिळाल्याने त्यांच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद आले. या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक होते. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी निष्ठावंत नगरसेवक उत्तम साखळकर यांना संधी दिली. गेली तीन वर्षे साखळकर हे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच भाजपने गटनेत्याचा राजीनामा घेतला होता. आता काँग्रेसमध्येही पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यानुसार साखळकर यांचा लवकरच राजीनामा होणार आहे. उद्या, शुक्रवारच्या महासभेत स्थायी सदस्य निवडी होणार आहेत. त्यासाठी गटनेत्यांकडून नावे दिली जाणार आहेत. या निवडी पार पडल्यानंतर साखळकर यांचा राजीनामा होणार आहे. काँग्रेस नेत्यांनीही त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक करीम मेस्त्री यांच्या राजीनामा अजूनही झालेला नाही. मेस्त्री यांच्या राजीनाम्यावरही नेतेमंडळी आग्रही आहेत.
चौकट
संतोष पाटील यांचे नाव चर्चेत
विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात मदनभाऊ गटाच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने याच गटाकडे विरोधी पक्षनेतेपद राहणार आहे. या गटातून संतोष पाटील यांचे नाव चर्चेत आहे; पण सध्या स्थायी सदस्यपदासाठीही ते इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते करणार की स्थायीमध्ये संधी मिळणार, याची चर्चा सुरू आहे.