महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:00+5:302021-04-08T04:27:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला उद्यान अधीक्षक शिवप्रसाद अण्णासाहेब कोरे यास बुधवारी महापालिका आयुक्तांनी निलंबित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला उद्यान अधीक्षक शिवप्रसाद अण्णासाहेब कोरे यास बुधवारी महापालिका आयुक्तांनी निलंबित केले. त्यांचा पदभार कनिष्ठ लिपिक गिरीश पाठक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेसाठी केलेल्या कामाचे बिल तयार करून देण्याच्या बदल्यात ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेचा वृक्ष अधिकारी तथा उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद कोरे (वय ५७, रा. पाटील गल्ली, नदीवेस, मिरज) यास बुधवारी रंगेहात पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिकेतील उद्याने विभागातही कारवाई केली होती.
तक्रारदार शासकीय कंत्राटदार असून, त्यांनी महापालिकेत केलेल्या कामाचे बिल तयार करण्यासाठी उद्यान पर्यवेक्षक कोरे याने त्यांच्याकडे बिलाच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी महापालिकेतील उद्याने विभागात सापळा लावून ७५ हजार रुपयांची रक्कम घेताना कोरे यास रंगेहात पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली कोरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाची दखल महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. नियमानुसार त्यांनी कोरे याच्या निलंबनाचे आदेश बुधवारी काढले. त्यांच्या जागी बाग विभागाचा प्रभारी कार्यभार कनिष्ठ लिपिक गिरीश पाठक यांच्याकडे दिला आहे. त्यांच्याकडील जबाबदारी सांभाळून ही अतिरिक्त जबाबदारी पाठक यांनी सांभाळावी, असे आदेशात म्हटले आहे.