मनपा क्रीडा स्पर्धांचा ‘खेळखंडोबा’ : क्रीडाधिकाऱ्यांनी चार्ज सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:39 PM2019-07-26T23:39:16+5:302019-07-26T23:40:13+5:30
रखरखत्या उन्हाने भाजून निघालेली मैदाने, जून चालू झाला की पावसाने चिंब भिजतात. सुटीत अडगळीत गेलेले क्रीडा साहित्य बाहेर निघते आणि खेळाडूंना वेध लागतात ते शालेय क्रीडा स्पर्धेचे.
आदित्यराज घोरपडे ।
सांगली : विकास कामांचा दिंडोरा पिटणाºया महापालिकेची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी ‘जैसे थे’च आहे. दरवर्षी होणाºया शासनाच्या महापालिकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रकच अद्याप मनपाने बनवले नाही. मनपाचे विद्यमान क्रीडाधिकारी अमजद जेलर यांनी अचानक क्रीडाधिकारी पदाचा चार्ज सोडला आहे. त्यातच जिल्हा व विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे क्रीडा स्पर्धांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
रखरखत्या उन्हाने भाजून निघालेली मैदाने, जून चालू झाला की पावसाने चिंब भिजतात. सुटीत अडगळीत गेलेले क्रीडा साहित्य बाहेर निघते आणि खेळाडूंना वेध लागतात ते शालेय क्रीडा स्पर्धेचे. पूर्वी जिल्हा व मनपास्तरीय या दोन्ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केल्या जात होत्या. मनपा क्रीडा स्पर्धेचा खर्च दरवर्षी मनपाकडून क्रीडाधिकारी कार्यालयास अदा केला जायचा. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मनपा स्वबळावर शालेय क्रीडा स्पर्धा घेते.
शालेय क्रीडा स्पर्धांची गुणवत्ता टिकवणे, एकविध खेळ संघटनांचे सहकार्य घेणे, स्पर्धेतील तक्रारींचा निपटरा करणे, स्पर्धेच्या प्रमाणपत्रांचे वेळेत वाटप करणे, पंचांचे मानधन अदा करणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवणे, विजेत्या खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी निवडपत्रे देणे ही आव्हानेही पेलण्यात मनपाचा क्रीडा विभाग ‘फेल’ झाला. त्यामुळेच मागीलवर्षीच्या मनपा शालेय स्पर्धेचा दर्जा घसरला आणि यावर्षी तर जुलै संपून आॅगस्ट उजाडत आला तरी, स्पर्धाच सुरू झालेल्या नाहीत.
मनपा क्रीडा विभागाचा हा वेळकाढूपणा क्रीडाशिक्षक व खेळाडूंची डोकेदुखी बनला आहे. कारण यंदाच्यावर्षी एकूण ५६ खेळांच्या स्पर्धा मनपास घ्याव्या लागतील. त्यातील ४९ खेळ अनुदानित आहेत. स्पर्धा आयोजनाचा शिवधनुष्य पेलण्यासाठी मनपाला ‘बाहुबली’ क्रीडाधिकाºयाची गरज आहे.
अर्धा डझन विजेत्यांचे कारायचे काय..?
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांना थेट सेवेत घेण्याचा महापालिकेचा ठराव आहे. त्यानुसार आजवर जवळपास अर्धा डझन विविध खेळांतील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना मनपाने नोकऱ्या दिल्या आहेत. त्यांच्या पगारावर मनपाचे लाखो रुपये खर्च होतात. नोकरी मिळाल्यानंतर मनपाची क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता उंचावण्यात मात्र या पुरस्कार विजेत्यांची कामगिरी शून्य आहे. मनपा क्षेत्रात खेळाचा सराव घेणे, खेळाडू घडविणे, त्यांना मार्गदर्शन करणे असे कोणतेच कार्य पुरस्कार विजेत्यांकडून होत नाही. मनपाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनातही त्यांचा कोठे सहभाग दिसत नाही. मग या अर्धा डझन पुरस्कार विजेत्यांचे करायचे काय, असा संतप्त सवाल क्रीडाशिक्षक व खेळाडूंमधून उपस्थित होत आहे.
सुहास व्हटकर प्रबळ दावेदार...
विद्यमान मनपा क्रीडाधिकारी अमजद जेलर यांनी क्रीडाधिकारी पदाचा चार्ज सोडल्यानंतर २६ जुलै २०१९ रोजी या पदासाठी पालिकेत मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेती महादेवी केरिपाळे, राष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच सुहास व्हटकर, शशिकांत गायकवाड व सूर्यकांत माळी यांना बोलाविण्यात आले होते. व्हटकर यांनी सलग दोन वर्षे नितीनकाका शिंदेंच्या नेतृत्वाखाली मनपाच्या स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. ते स्वत: राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू असून घरपट्टी विभागात कार्यरत आहेत. विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धांपासून राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मोठा अनुभव व्हटकर यांच्याकडे आहे. क्रीडा कार्यकर्ता, पंच, आयोजक, संघटक, सूत्रसंचालक, प्रशिक्षक अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यामुळे मनपा क्रीडाधिकारी म्हणून व्हटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
काकांचा करेक्ट कार्यक्रम...
जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीनकाका शिंदे यांनी सलग दोन वर्षे मनपा क्रीडाधिकारीपदी काम केले. त्यांच्या काळात मनपाच्या सर्वाधिक १४२ खेळांच्या स्पर्धा वेळेत पार पडल्या. विजेत्यांना प्रमाणपत्रे मिळाली. पंचांना मानधन मिळाले. इतकेच नव्हे, तर शिंदेंनी पदरमोड करून विजेत्या खेळाडूंना मेडल्स दिली. मात्र शिंदेंना एका रात्रीत या पदावरून हटविण्यात आले. तेव्हापासून मनपाच्या क्रीडा विभागास उतरती कळा लागली.
मनपाच्या शालेय क्रीडा स्पर्धा नियोजनाची अद्याप
कोणतीच बैठक झालेली नाही. वेळापत्रकही तयार नाही. विभागीय स्पर्धांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एकाचवेळी खेळाडू दोन दोन स्पर्धा कसे खेळतील! मनपा क्रीडाधिकारी भेटत नाहीत. मनपा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून खेळाडूंचे नुकसान होत आहे.
- मुन्ना आलासे, क्रीडाशिक्षक, उर्दू हायस्कूल, सांगली