महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्याला ७५ हजारांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:28 AM2021-04-01T04:28:28+5:302021-04-01T04:28:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेसाठी केलेल्या कामाचे बिल तयार करून देण्याच्या बदल्यात ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेसाठी केलेल्या कामाचे बिल तयार करून देण्याच्या बदल्यात ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेचा वृक्ष अधिकारी तथा उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद अण्णासाहेब कोरे (वय ५७, रा. पाटील गल्ली, नदीवेस, मिरज) यास बुधवारी रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिकेतील उद्याने विभागात ही कारवाई केली.
तक्रारदार शासकीय कंत्राटदार असून, त्यांनी महापालिकेत केलेल्या कामाचे बिल तयार करण्यासाठी उद्यान पर्यवेक्षक कोरे याने त्यांच्याकडे बिलाच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता, लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार बुधवारी महापालिकेतील उद्याने विभागात सापळा लावून ७५ हजार रुपयांची रक्कम घेताना कोरे यास रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली कोरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लाचलुचपतचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, भास्कर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
मार्चमध्ये धडाका
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या महिन्यात चार कारवाया केल्या आहेत. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून, अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक घाटगे यांनी केले आहे.