..अखेर आष्ट्यातील शिवरायांच्या पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा, पालिकेकडे जागा वर्ग; शिवप्रेमींचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:44 PM2023-01-05T15:44:07+5:302023-01-05T15:46:09+5:30
पुतळा उभारण्यावरून दोन गट आमनेसामने
आष्टा : येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी व बगीच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी नगरपालिकेकडे जागा वर्ग केली. पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिवप्रेमींनी जल्लोष केला. दरम्यान, भाजप व शिवप्रेमींनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आष्टा येथील शिवाजी चौकात शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेने ठराव संमत केला आहे. नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. राज्य शासनाची जागा पालिकेच्या नावावर व्हावी, यासाठी पुतळा संघर्ष समितीने सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्याला नगरपालिकेतील पुतळा समितीने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पुतळा समितीचे पोपट भानुसे, वैभव शिंदे व सहकाऱ्यांची प्रशासनासोबत बैठक झाली होती. प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. ४ जानेवारीपर्यंत पालिकेकडे जागा वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी आष्टा पालिकेकडे पुतळा व बगीच्यासाठी जागा वर्ग करण्यात आली.
दरम्यान, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मध्यरात्री प्रवीण माने व शिवभक्तांनी शिवाजी चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला होता. यावेळी पाटील यांच्यासह ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी आष्टा व इस्लामपूरसह वाळवा तालुका बंदचे आवाहन केले होते. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
यादरम्यान मंगळवारी रात्री प्रशासनाने शिवरायांचा पुतळा दुसरीकडे हलवला आणि चौकातील कट्टा काढून टाकला. बुधवारी सकाळी दत्त मंदिर चौकात पुतळा समितीचे अध्यक्ष विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, वीर कुदळे, ॲड. मोहन पाटील, सुधीर पाटील, अर्जुन माने, अमोल पडळकर, शिवाजी चोरमुले, दिलीप वग्याणी, माणिक शेळके, संग्राम फडतरे, ॲड. अभिजीत वग्याणी, अनिल पाटील, सतीश माळी, धैर्यशील शिंदे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी बंदला विरोध केला. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
श्रेयवाद पेटला
पुतळा उभारण्यावरून दोन गट आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकत्र असून भाजपचा गट त्यांच्याविरोधात आहे. पुतळ्यासाठी जागा आमच्यामुळेच वर्ग झाली, असे संदेश सोशल मीडियावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केले. या दोन्ही गटांमध्ये आता श्रेयवाद पेटला आहे.