धक्कादायक ! १३ दिवसाच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 03:20 PM2020-11-04T15:20:51+5:302020-11-04T15:23:25+5:30
murder, sangli, bhilwadi-malwadi, child, police, माळवाडी ता. पलूस येथील पाटील मळा येथील एका घरात अवघ्या तेरा दिवसाच्या लहान बालकाचा अज्ञात व्यक्तीने घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला आहे.सदर घटना बुधवारी सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली.
भिलवडी- माळवाडी ता. पलूस येथील पाटील मळा येथील एका घरात अवघ्या तेरा दिवसाच्या लहान बालकाचा अज्ञात व्यक्तीने घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला आहे.सदर घटना बुधवारी सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली.
याबाबत उत्तम धोंडीराम माळी यांनी भिलवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.माळवाडी -वसगडे रस्त्यालगत माळी यांचा शेतातील वस्तीवर साई दीप नावाचा बंगला आहे.सकाळी घरातील सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते.त्यांची मुलगी ऐश्र्वर्या अमित माळी ही तेरा दिवसाच्या बाळासोबत बेडरूम मध्ये झोपली होती.तिची आई व वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुत होत्या. ऐश्र्वर्या घराबाहेर असणाऱ्या बाथरूम मध्ये गेली.
यावेळी खाटेवर बाळ झोपी गेले होते. ती परत घरातील बेडरूम मध्ये आली.तेव्हा खाटेवरून बाळ गायब झाल्याचे लक्षात आले.तिने सर्वांना बोलावून घेवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला.सर्वत्र शोधाशोध घेतली.काही नागरिकांनी शंका आली म्हणून बंगल्याच्या गच्चीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडले असता पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह तरंगत असताना दिसून आला.
याबाबत भिलवडी पोलिस ठाण्यात वर्दी देण्यात आली.भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग,पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा सुरू केला.तासगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपास कामी योग्य त्या सूचना दिल्या.भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाची उत्तरीय चाचणी सुरू होती.पोलिसांनी सर्व कुटुंबीय व शेजाऱ्यां कडून या घटनेची सखोल चौकशी सुरू ठेवली आहे.
पाठीमागील दरवाजा उघडून संशयित पसार....
माळी यांच्या बंगल्यात मध्यभागी जिना आहे.अज्ञाताने ऐश्र्वर्या बंगल्यातून बाहेर पडल्याचे पाहून घरात प्रवेश करून बाळाला पाण्याच्या टाकीत टाकून परत खाली येवून पाठीमागील दरवाजा उघडून शेतातून पसार झाला असल्याचे घटनास्थळावरून निदर्शनास येते.