विवाहास नकार देणाऱ्या मुलीचा बापाकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:05+5:302021-03-21T04:26:05+5:30
उत्तम चौगुले शेतमजूर आहे. त्याच्याकडे एक एकर कोरडवाहू जमीन आहे. त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. यापैकी ताई ...
उत्तम चौगुले शेतमजूर आहे. त्याच्याकडे एक एकर कोरडवाहू जमीन आहे. त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. यापैकी ताई ही थोरली कन्या बारावीत होती, तिचे वय अठरा वर्षे पूर्ण होताच तिला स्थळे बघण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी सैन्यात असलेल्या मुलाचे स्थळ आले होते. तो सरकारी नोकरीत असल्याने तिने लग्न करावे, असा उत्तमचा आग्रह होता, पण तिने मुलगा पसंत नसल्याने लग्नास नकार दिला होता.
दि. १३ रोजी सायंकाळी बाप, लेकीशिवाय घरात कोणीच नव्हते. त्यावेळी उत्तमने रागातून तिला लग्न का करत नाहीस, असे विचारत गाजरे खोदण्याच्या बेडग्याने मारहाण तिला केली. रागाच्या भरात खूप वेळ मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घरातील सर्वजण आल्यानंतर त्याने तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले. पहाटे अंत्यसंस्कारही उरकून टाकले. मात्र गावात कुणकुण लागताच दोन दिवसांपूर्वी पोलीस पाटील हनुमंत जयवंत पाटील यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले यांनी हे खून प्रकरण उघडकीस आणले. विट्याचे पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलिसांना मार्गदर्शन केले.
चौकट
पोलिसांचा प्रसाद मिळताच कबुली
प्रकरणाची माहिती मिळताच आटपाडीचे सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गबाले यांनी संशयित उत्तम चौगुले याला शनिवारी चौकशीसाठी आणले. प्रथम त्याने पोलिसांना काही सांगण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. रक्तदाबाचा त्रास असल्याने, आपण रागाच्या भरात खूप मारले. त्यात तिचा जीव गेल्याचेही कळले नाही, अशी कबुली त्याने दिली आहे. खुनातील बेडगे सायंकाळी जप्त केले आहे.