सांगलीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचाच मर्डर... : पोलिसाचा खून करून आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:15 AM2018-07-19T01:15:42+5:302018-07-19T01:16:43+5:30
सचिन लाड ।
सांगली : वारणानगर येथे नऊ कोटींच्या रकमेवर पोलिसांचा डल्ला, लूटमारीतील संशयित अनिकेत कोथळे याची पोलीस कोठडीत हत्या अशा अर्धा डझनवर घटनांनी जिल्हा पोलीस दलाची पुरती बेअब्रू झाली. अशा घटनांमधून सावरून पोलीस दल उभारी घेत असतानाच, मंगळवारी रात्री सांगलीत हॉटेलमध्ये एका पोलिसाचाच धारदार शस्त्राने १८ वार करून खून केल्याने संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे. समाजाच्या रक्षणकर्त्याचीच हत्या करून हल्लेखोरांनी कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
खाकी वर्दीतील पोलीस रस्त्यावरून चालत निघाला तरी लोक घाबरत. गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेतील पोलीस आणि स्थानिक शाखेतील पोलिसांचा समाजात आदरयुक्त दरारा होता. पण काळ बदलला. पोलीस दलाचे अत्याधुनिकीकरण झाले. पोलिसांच्या कामाच्या पध्दतीत आमूलाग्र बदल झाले. कामाचे तास वाढले. पोलीस दलातही गुन्हेगारी फोफावली. त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला. अजूनही काही चांगले कर्तबगार वरिष्ठ अधिकारी व जुन्या कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाचा दरारा टिकून आहे.
मिरज शहर पोलीस ठाण्यातील समाधान मांटे यांचा मंगळवारी रात्री सांगलीतील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये धारदार हत्याराने १८ वार करून अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला. मांटे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला व त्यांचा तडफडून झालेला मृत्यू हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयात कैद झाला आहे. हॉटेल व्यवस्थापकासह कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. मात्र एकानेही हल्लेखोरास रोखण्याचे धाडस दाखविले नाही. हे सर्वजण मदतीसाठी धावले असते, तर मांटे यांचा जीव गेला नसता. हल्लेखोरांनी मांटे यांच्या अंगावर वर्दी असताना त्यांना मारून टाकले, तर मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिनधास्त हल्ला : हत्यार सोबतच
हल्लेखोराने मांटे यांच्यावर बिनधास्त हल्ला केला. संशयिताकडे गाडीत हत्यार होते. त्याने अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीमुळे पोलीस शहरात २४ तास रस्त्यावर आहेत. मोठी वाहने तपासली जात आहेत, पण शहरात सायंकाळनंतर तरुणांची टोळकी दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून हुल्लडबाजी करतात. वेडीवाकडी वाहने चालवितात. जाब विचारला तर कमरेला लावलेले हत्यार काढतात. या घटनेमुळे आता सरसकट वाहने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणांकडील हत्यारांचा शोध घेण्याची गरज आहे.
हॉटेल, ढाबे सुरूच
महापालिका आचारसंहितेमुळे पोलिसांनी रात्री साडेदहानंतर हॉटेल, ढाबे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक हॉटेल मालकांचे पोलीस अधिकाºयांशी लागेबांधे असल्यामुळे रात्री साडेदहानंतर बाहेरून हॉटेल बंद करून मागून मध्यरात्रीपर्यंत ते सुरूच असते. हॉटेल रत्ना डिलक्समध्ये पोलिसाचा खून रात्री पावणेबाराला झाला. यावरून हे हॉटेल एवढ्या रात्रीपर्यंत कसे सुरू होते, संजयनगर पोलिसांना याची माहिती नसावी का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
रात्रीची गस्त हवीच
शहरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे. निवडणुका किंवा सणावेळी औपचारिकता म्हणून कारवाई करण्याची पद्धत बंद झाली, तरच अशा विचित्र मानसिकतेच्या तळीरामांना आळा बसू शकतो. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी अशा कारवाईत सातत्य ठेवल्यामुळे त्याचा परिणाम अपघातांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा बसण्यावरही झाला होता. त्यादृष्टीने तयारी करायला हवी.