इस्लामपुरात किरकोळ कारणावरून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:26 PM2021-02-01T19:26:18+5:302021-02-01T19:32:54+5:30
Murder Sangli Police- इस्लामपूर शहरातील उरुण परिसरातील नवेखेड रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली.हा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास घडला.शेतातील पाण्याच्या वादातून हा प्रकार झाला.यातील हल्लेखोर फरार झाला आहे.
इस्लामपूर: शहरातील उरुण परिसरातील नवेखेड रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली.हा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास घडला.शेतातील पाण्याच्या वादातून हा प्रकार झाला.यातील हल्लेखोर फरार झाला आहे.
अशोक आनंदराव पाटील (४३,रा.साखराळे,ता.वाळवा) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.तर प्रशांत बाबुराव पाटील (रा.उरुण)असे हल्लेखोराचे नाव आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नवेखेड रस्त्यावर सुरज पाटील यांच्या शेतात अशोक पाटील हा काम करत होता.तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या नवरा-नवरी सहकारी पाणी पुरवठा संस्थेत पाटकरी म्हणूनही काम करायचं. सुरज पाटील यांच्या शेताला या लागूनच हल्लेखोर प्रशांत पाटील याचे क्षेत्र आहे.
प्रशांत पाटील याच्या शेतात पाणी जाते यावरून हा वाद झाला.दोन दिवसांपूर्वी या वादावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक झाली होती.त्यामध्ये दोघांची वादावादी झाली होती. तसेच दोन दिवसात शेतात जाणारे पाणी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले होते.
आज अशोक पाटील हा शेतात काम करत असताना प्रशांत पाटील हा तेथे आला.रागाच्या भरात त्याने अशोक पाटील याला लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली.त्यातील एक फटका अशोक पाटील याच्या डोक्यात वर्मी बसल्याने तो जाग्यावर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला.
डोक्यात घाव बसल्याने तो जागीच गतप्राण झाला.त्यानंतर हल्लेखोर प्रशांत पाटील याने घटनास्थळावरून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.गुन्ह्याची सर्व माहिती घेत त्यांनी हल्लेखोर पाटील याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली.