अनैतिक संबंधातून नागाव कवठेत खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:26 AM2021-05-14T04:26:58+5:302021-05-14T04:26:58+5:30
तासगाव : अनैतिक संबंधातून तासगाव तालुक्यातील नागाव कवठे गावच्या हद्दीत एकाचा खून झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी ...
तासगाव : अनैतिक संबंधातून तासगाव तालुक्यातील नागाव कवठे गावच्या हद्दीत एकाचा खून झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अभिजित सुधाकर नवपुते (वय ३५, रा. औरंगाबाद) असे मृताचे नाव असून, प्रशांत अशोक पाटील (३७, रा. कुमठे, ता. तासगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिजित हे ‘महावितरण’कडे वायरमन म्हणून कुमठे येथे कार्यरत होते. त्यातून संशयित प्रशांत आणि अभिजित यांची ओळख झाली होती. संशयित प्रशांत याचे आणि अभिजित यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण अभिजित यांना लागली होती. यावरून अभिजित आणि प्रशांत यांच्यात खटके उडाले होते. रविवारी (दि. ९) प्रशांतने अभिजित यांना सकाळी अकरा वाजता तासगाव-सांगली रस्त्यावरील बंद अवस्थेत असणाऱ्या हनुमान पेट्रोल पंपावर बोलावून घेतले.
त्याठिकाणी प्रशांतने दारूतून विषारी गोळी जबरदस्तीने देऊन अभिजित यांचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेह पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहात टाकून दिला. त्या मृतदेहावर शेजारील शेतातील माती टाकून मृतदेह मुजवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा पश्चाताप झाल्याने गुरुवारी सकाळी तो पोलिसांत स्वतःहून हजर झाला. त्याने पोलिसांना खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली असता खून केल्याचे दिसून आले. याप्रकरणी कवठेएकंदचे पोलीसपाटील मल्हारी शहाजी पाटील यांनी वर्दी दिली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, पंकज पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.