सांगलीतील आरेवाडीमधील तरुणाचा खून प्रेमसंबंधातून, पाच जणांवर गुन्हा; हल्लेखोरांचा शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:37 PM2022-11-24T12:37:23+5:302022-11-24T12:38:30+5:30
मंदिरातील कार्यालयातच केला होता खून
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा मंदिरासमोरील देवस्थानच्या देणगी कार्यालयात मंगळवार दि. २२ रोजी मारुती ऊर्फ नाना जगन्नाथ कोळेकर या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, फरारी हल्लेखोरांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी मृत मारुती कोळेकर याचा चुलत भाऊ बिरू बाळासाहेब कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अनिल श्रीरंग कोळेकर (वय ३५), संजय श्रीरंग कोळेकर (३०), बंडू दामाजी कोळेकर, इंद्रजित काशिलिंग कोळेकर (२७, सर्व रा. आरेवाडी), अमोल युवराज घागरे (वय २५ रा. ढालगाव) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत मारुती कोळेकर याचे हल्लेखोर अनिल व संजय कोळेकर यांच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यादरम्यान हल्लेखोरांच्या नात्यातील अमोल युवराज घागरे (रा. ढालगाव) याने मंगळवारी सकाळी मारुतीला धमकावले होते. यावेळीही त्यांच्यात वाद झाला. यानंतर मारुती हा देवस्थान समितीच्या देणगी कार्यालयात जाऊन बसला.
याची माहिती मिळताच अनिल कोळेकर, संजय कोळेकर, अक्षय ऊर्फ बंडू कोळेकर, तसेच अमोल घागरे (रा. ढालगाव) व इंद्रजित कोळेकर (रा. आरेवाडी) हे सर्वजण बनात आले. बिरोबा मंदिरासमोरील देणगी कार्यालयात घुसून त्यांनी दाराची कडी आतून लाऊन घेतली. चाकूसारख्या धारधार शस्त्राने मारुतीच्या पोटावर, मानेवर, हातावर, पाठीवर वार करून त्याचा खून केला. इंद्रजित कोळेकर याने हल्ल्यासाठी शस्त्रे आणल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर पाचही हल्लेखोर फरारी असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणामुळे ढालगावसह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बिरोबा मंदिरासमोरील देणगी कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी रात्री उशिरा मृत मारुती कोळेकर याच्या पार्थिवावर आरेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.