Crime News Sangli: वाटेगावात युवकाचा खून, अवघ्या ६ तासात पोलिसांनी दोघांना केली अटक; नेमकं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:32 PM2022-05-31T19:32:09+5:302022-05-31T19:45:14+5:30
पोलिसांनी केवळ ६ तासातच तपासाची चक्रे फिरवत याप्रकरणी संशयित दोन आरोपींना अटक केली.
कासेगाव/वाटेगाव : वाटेगाव (ता वाळवा ) येथील भुयाचा घोळ परिसरातील भोगावती ओढ्यात (ओढा पात्रात) प्रवीण प्रकाश साळुंखे उर्फ भावड्या (वय-३२ रा. वाटेगाव वाडी विभाग) या युवकाचा खून झाल्याची घटना आज, सकाळी उघडकीस आली. मद्यपान करुन शिव्या दिल्याच्या कारणावरून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी केवळ ६ तासातच तपासाची चक्रे फिरवत याप्रकरणी संशयित दोन आरोपींना अटक केली.
गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण (वय ३२) व मोहन उर्फ बाळ्या चव्हाण (२४, रा. वाटेगाववाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, काल, सोमवारी रात्री हे तिघे मित्र मद्यपान करत असताना बोलता बोलता शिवीगाळ सुरू झाली. यावेळी संशयितांनी शिव्या का दिल्यास म्हणून चिडून प्रवीणला दंडक्याने मारहाण केली. यात प्रवीणचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत अवघ्या ६ तासात संशयित आरोपींना जेरबंद केले.
स. पो. नि अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम कुंभार, अविनाश लोहार, आनंद उथळे, सुनिल पाटोळे, महेश गायकवाड, राहुल पाटील पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी मृत प्रवीणचे वडील प्रकाश हिंदुराव साळुंखे यांनी कासेगाव पोलिसात तक्रार दिली.