सांगलीतील इस्लामपुरात वृद्धाचा खून, हल्लेखोरांकडून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:14 PM2022-11-15T17:14:27+5:302022-11-15T17:15:04+5:30

मालमत्ता किंवा आर्थिक वादातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Murder of an old man in Islampur in Sangli, Attempted suicide by attackers | सांगलीतील इस्लामपुरात वृद्धाचा खून, हल्लेखोरांकडून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न

सांगलीतील इस्लामपुरात वृद्धाचा खून, हल्लेखोरांकडून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न

googlenewsNext

इस्लामपूर : शहरातील बहे रस्त्यावरील पेठकर कॉलनीमधील ८० वर्षीय वृद्धाचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात हत्याराने वार करून खून केला. हल्लेखोरांनी आत्महत्येचा बनाव करण्यासाठी मृताच्या गळ्यात दोरीने फास देऊन ती छताला बांधली होती. रविवारी मध्यरात्री घडलेली घटना सोमवारी सकाळी साडेअकराला उघडकीस आली. मालमत्ता किंवा आर्थिक वादातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हंबीरराव शंकर साळुंखे-खोत (वय ८०, रा. पेठकर कॉलनी, इस्लामपूर, मूळ रा. फार्णेवाडी-बोरगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावजय सुशीला आबासाहेब साळुंखे (रा. केएनपीनगर, इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात संशयितांवर खुनाच्या गुन्ह्याची नोंद आहे.

हंबीरराव साळुंखे यांनी दीड वर्षापूर्वी पेठकर कॉलनीतील घर खरेदी केले होते. येथे ते पत्नीसह राहत होते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त ठाणे येथे वास्तव्यास आहे. साळुंखे यांच्या पत्नी दोन दिवसांपूर्वी मुलाकडे गेल्या होत्या. त्यामुळे रविवारी रात्री ते घरी एकटेच होते.

रविवारी रात्री हल्लेखोर त्यांच्याकडे आले असावेत. ते त्यांच्या परिचयाचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बेडरूममध्ये साळुंखे यांचा मृतदेह गळ्याला दोरी लावलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचा संशय आहे.

हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वानाला घटनास्थळावरील वस्तूचा वास देण्यात आला. त्यावर श्वान घराच्या सभोवती फिरून प्रवेशद्वारातच घुटमळले. घटनास्थळावरून ठसे मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासकामी सूचना केल्या. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.

रक्ताने माखलेल्या पायांचे ठसे

साळुंखे यांच्या स्वयंपाकघरात रक्ताने माखलेल्या पायांचे ठसे उमटले होते. हल्लेखोरांनी मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावून वाहनाने पोबारा केला असण्याची शक्यता आहे. घटनास्थळावर महिलेची चप्पल मिळून आली.

Web Title: Murder of an old man in Islampur in Sangli, Attempted suicide by attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.