Sangli: बेळंकीत मूकबधिर तरुणाचा निर्घृण खून, खुनाचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:59 AM2024-11-11T11:59:23+5:302024-11-11T11:59:50+5:30
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल, श्वान पथक घुटमळले
मिरज : बेळंकी (ता. मिरज) येथे जानराववाडी रस्त्यावर उमेश पांडुरंग कांबळे (वय ४०) या मूकबधिर व मतिमंद तरुणाचा दगडावर डोके आपटून खून करण्यात आला. खुनाच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
बेळंकी ते जानराववाडी रस्त्यावर रेल्वे पुलानजीक रविवारी सकाळी उमेश कांबळे या मूकबधिर व मतिमंद तरुणाचा मृतदेह रस्त्याकडेला पडल्याचे दिसून आले. शेजारी पडलेल्या दगडावर रक्त लागल्याचे निदर्शनास आले. उमेश याच्या डोक्याला मोठी जखम झाली असून, त्यास ढकलून दगडावर डोके आपटून किंवा दगड डोक्यात घालून खून केल्याचा संशय आहे. मूकबधिर व मतिमंद उमेश कांबळे याच्या खुनामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. रविवारी मध्यरात्री ही खुनाची घटना घडल्याचा संशय आहे.
गावात फिरणारा उमेश शनिवारी रात्री घरी परतला नव्हता. रविवारी सकाळी त्याच्या खुनाची बातमी गावात पसरली. उमेश याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची चर्चा सुरू झाल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बेळंकीचे पोलिस पाटील चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उमेश याच्या खुनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. मूकबधिर आणि मतिमंद उमेशच्या खुनामागे काय कारण असू शकते? याबाबत चर्चा सुरू आहे.
श्वान पथक घुटमळले
आरोपीच्या शोधासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथक घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. त्यामुळे पुढील माग काढता आला नाही. उमेश कांबळे याच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत तपास सुरू आहे.