सांगली: अनैतिक संबंधाच्या संशयावरून कवलापुरातील कामगाराचा खून, दोघा संशयितांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:35 PM2022-09-28T16:35:18+5:302022-09-28T17:02:47+5:30
बुधगाव येथील बनशंकरी मंदिराशेजारी राहण्यास असलेल्या विठ्ठल जाधव याचा सोमवारी दुपारी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळाच्या खुल्या जागेत सोमवारी दुपारी झालेल्या फरशी कामगाराच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय ४०, रा. बुधगाव) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अजय संजय पवार (२३) आणि दौलत सर्जेराव पवार (३७, दोघेही रा. गोसावी गल्ली, बुधगाव) या संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधगाव येथील बनशंकरी मंदिराशेजारी राहण्यास असलेल्या विठ्ठल जाधव याचा सोमवारी दुपारी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. एलसीबीचे पथक याचा तपास करत असताना जाधव याच्या शेजारी राहणाऱ्या अजय पवार आणि दौलत पवार या संशयितांची नावे समोर आली. त्यानुसार रात्री उशिरा सांगली शहरातील शंभरफुटी रोड परिसरात त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी यातील संशयित दौलत पवार याने नातेवाईक महिलेशी मृत जाधव याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्याचा खून केल्याची कबुली दिली.
मृत विठ्ठल आणि संशयित दौलत पवार हे दोघेही एकत्र गवंडी आणि फरशी फिटिंगचे काम करत होते. त्यामुळे जाधव याचे पवार याच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. जाधव वारंवार येत असल्याने नातेवाईक महिलेशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पवारला होता. यातूनच जाधवचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र जाधव, संदीप गुरव, सागर लवटे, बिरोबा नरळे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कामावरुन बोलावत विमानतळावर आणले
सोमवारी मृत जाधव हा कुपवाड येथील कापसे प्लॉटमधील एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. यावेळी दोघेही संशयित तिथे गेले व त्यांनी काम असल्याचे सांगत जाधव याला कवलापूर विमानतळ परिसरात आणले. याठिकाणी जाधव याच्या गळ्यावर, तोंडावर, हातावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची कबुली दोघांनी दिली.