सांगलीत कुख्यात गुंड सच्या टारझनचा खून, संशयितास अटक; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
By शीतल पाटील | Published: July 24, 2023 02:28 PM2023-07-24T14:28:02+5:302023-07-24T14:39:44+5:30
नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा राग, सच्या टारझन झोपेत असतानाच केले कोयत्याने सपासप वार
कुपवाड : मोकातील आरोपी कुख्यात गुंड सचिन ऊर्फ कमलाकर पांडुरंग जाधव ऊर्फ सच्या टारझन (वय ४५, मूळ नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा, सध्या रा. अहिल्यानगर, कुपवाड) याचा सोमवारी पहाटे अहिल्यानगर येथे कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. नात्यातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून गणेश विनोद मोरे (वय १९) याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. खुनानंतर संशयित स्वत: कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात हजर झाला.
सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सध्या जामिनावर होता. गेल्या काही दिवसांपासून तो कुपवाड-माधवनगर मार्गावरील अहिल्यानगर परिसरात वास्तव्यास होता. संशयिताच्या नात्यातील महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. तिच्याच घरात पहाटे पाचच्या सुमारास सच्या टारझन झोपेत असताना संशयिताने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सच्याच्या डोक्यात, मानेला, तोंडाला वर्मी वार झाले. त्याने हाताने वार अडविण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या हाताची बोटेही तुटली. घरात रक्ताचा सडा पडला होता.गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर संशयित गणेश मोरे कोयत्यासह कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांचे पथक दाखल झाले होते.
टारझनविरुद्ध नऊ गुन्हे
सच्या टारझनवर सांगली शहर, विश्रामबाग आणि कऱ्हाड पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक दाद्या सावंतचा खून, अवैध शस्त्रसाठा, आत्महत्येस प्रवृत्त करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारामारी, खंडणी असे सात गुन्हे सांगली शहर पोलिसांत दाखल आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात खंडणी आणि अवैध शस्त्राचा गुन्हा दाखल आहे. काही वर्षांपूर्वी सच्याकडून कऱ्हाड पोलिसांनी पाच पिस्तुले जप्त केली. सांगलीत त्याच्या दोन साथीदारांकडून तीन पिस्तुले, दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले होते.