जागेच्या वादातून छातीवर मारली लाथ, मिरजेतील वृद्धाचा जागीच मृत्यू; निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या पुत्रास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:05 PM2022-02-11T13:05:00+5:302022-02-11T13:24:08+5:30
तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत वृद्धाच्या छातीवर जोरात लाथ मारली
मिरज : मिरजेत पंढरपूर रस्त्यावर जागेच्या वादातून छातीत लाथ मारल्याने जयंतीलाल मूलजी ठक्कर (वय ८२) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. वृद्धाच्या खूनप्रकरणी राहुल मोहन मोरे (वय ४२) या निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या पुत्रास पोलिसांनी अटक केली. याबाबत मयूर जयंतीलाल ठक्कर यांनी वडिलांच्या खुनाची फिर्याद दिली आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठक्कर यांचे श्रीवल्लभ निवास हे घर व घरासमोर पडदे व गादी विक्रीचे दुकान आहे. राहुल मोरे हा त्यांचा शेजारी असून ठक्कर यांच्या गादी कारखान्याच्या शेडचा काही भाग राहुल याच्या प्लाॅटमध्ये आल्याचा राहुल याचा आक्षेप होता.
गुरुवारी सकाळी घरासमोरील दुकानात मयूर व वडील जयंतीलाल बसले असताना राहुल मोरे तेथे आला. त्याने तुमच्या कारखान्याच्या शेडचा भाग माझ्या प्लॉटमध्ये येतो तो आजच्या आज काढून घ्या, असे ठक्कर यांना बजावले. मयूर ठक्कर यांनी शासकीय मोजणी करुन घेऊन जर तुमच्या प्लॉटमध्ये शेडचा भाग येत असेल तर काढून घेतो, असे सांगितल्याने राहुल मोरे रागाने ठक्कर यांच्या दुकानात शिरला.
मयूर ठक्कर यांनी तू दुकानातून बाहेर जा असे म्हणाल्याने मला जा म्हणणारे तुम्ही कोण, असे म्हणत रागाने शिवीगाळ करून मयूर यांना ढकलून पाठीत लाथ मारून खाली पाडले. तुम्ही शेडचा भाग काढला नाही तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले.
यावेळी मयूर यांचे वडील जयंतीलाल यांनी मध्यस्ती करीत त्यास समजावण्याचा प्रयत्न केल्याने, तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत जयंतीलाल यांच्या छातीवर जोरात लाथ मारून त्यांना खाली पाडले. छातीवर लाथ वर्मी बसल्याने वृद्ध जयंतीलाल यांचा जागीच मृत्यू झाल्याची तक्रार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करुन राहुल मोरे यास पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सावंत्रे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.