सांगलीतील राहुल साळुंखेचा खून पूर्ववैमनस्यातूनच; चौघांना तत्काळ अटक, एक अल्पवयीन युवकाचा सहभाग
By घनशाम नवाथे | Published: April 11, 2024 08:09 PM2024-04-11T20:09:08+5:302024-04-11T20:09:26+5:30
१८ जानेवारी रोजी कोयत्याचा धाक दाखवून कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आले.
सांगली: येथील गणपती मंदिरासमोर राहुल संजय साळुंखे (वय २२, रा. जामवाडी) याचा खून केल्याप्रकरणी संशयित अनिकेत उर्फ मोन्या संजय सलगरे (वय १९), भूषण संजय एडके (वय २६, रा. गवळी गल्ली), अभिषेक सतीश भोजने (वय २०, अरिहंत कॉलनी, शामरावनगर), अक्षय चंद्रकांत सलगरे (वय २७, रा. गवळी गल्ली) या चौघांना अटक केली. तर अल्पवयीन युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि आईवर खुनी हल्ला याचा वचपा काढण्यासाठी हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक माहिती अशी, दि. १८ जानेवारी रोजी कोयत्याचा धाक दाखवून कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आले. यावेळी मुलीच्या आईवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सांगली शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुलीची सुटका केली होती. याप्रकरणी समर्थ भारत पवार (वय २२, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली), राहुल संजय साळुंखे (रा. २२, रा. जामवाडी), आदित्य गणेश पवार (वय २०, रा. जामवाडी), शुभम नामदेव पवार (वय २२ रा. गावभाग) या टोळीला अटक केली होती. या गुन्ह्यात राहुल याला जामिन मंजूर झाला होता.
बुधवारी रात्री राहुल आणि मित्र तेजस करांडे हे दोघेजण एका युवतीने भेटायला बोलवले म्हणून गणपती मंदिरासमोर आले होते. दुचाकी लावून त्यावर बसले असतानाच संशयित पाचजण कोयता व धारदार शस्त्र घेऊन आले. राहुलच्या पोटात, डोक्यात व पाटीवर, छातीवर वार केले. मित्र तेजस पुढे आल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
हल्ला केल्यानंतर संशयित पाचजण तेथून पळाले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दोन पथके रात्रीच रवाना केली होती. उपनिरीक्षक महादेव पोवार, कर्मचारी संतोष गळवे, गौतम कांबळे यांनी १२ तासात पाचजणांना ताब्यात घेतले. एकजण अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार तपास करत आहेत.
संशयिताच्या घरावर दगड फेकले -
खुनातील मुख्य संशयित गवळी गल्ली येथील आहेत. त्यांचा सहभाग निश्चित असल्याचे समजल्यानंतर मृत राहुलच्या समर्थकांनी घरासमोर जावून शिवीगाळ करत दगड फेकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सीसीटीव्हीत फुटेज ताब्यात -
गणपती मंदिरासमोर राहुल आणि मित्र तेजसवर पाचजणांनी हल्ला केल्याचा प्रसंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.