Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरून सहा लाखांची सुपारी देऊन खून, कासेगाव येथील सावकाराच्या खूनप्रकरणी तीन संशयित अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:23 PM2024-08-19T13:23:55+5:302024-08-19T13:24:17+5:30

खुनाच्या घटनेचा अवघ्या ३६ तासांत छडा

Murder of six lakh betel nut on suspicion of immoral relationship, murder of moneylender in Kasegaon solved in just 36 hours | Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरून सहा लाखांची सुपारी देऊन खून, कासेगाव येथील सावकाराच्या खूनप्रकरणी तीन संशयित अटकेत

Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरून सहा लाखांची सुपारी देऊन खून, कासेगाव येथील सावकाराच्या खूनप्रकरणी तीन संशयित अटकेत

इस्लामपूर : कासेगाव (ता.वाळवा) येथे १६ ऑगस्टच्या सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडत पांडुरंग भगवान शिद (४३, रा.कासेगाव) यांचा खून करण्यात आला. या थरारक घटनेत कोणताही पुरावा हातात नसताना, पोलिसांच्या पाच पथकांनी स्थानिक माहितीवरून खुनाची सुपारी देणाऱ्या सूत्रधारासह त्याच्या दोन साथीदारांच्या अवघ्या ३६ तासांत मुसक्या आवळल्या. पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खुनासाठी सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तिघा संशयितांना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सुरेश नारायण ताटे (४५, लोणार गल्ली, इस्लामपूर), विशाल जयवंत भोसले (२५, कामेरी, ता.वाळवा) आणि शिवाजी भीमराव भुसाळे (३७, महादेवनगर, इस्लामपूर. मूळ रा.उजळम, जि.बिदर-कर्नाटक) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत. खुनात वापरलेले पिस्तूल, दुचाकी आणि अंगावरील कपडे हस्तगत करावयाची आहेत.

उपअधीक्षक चव्हाण म्हणाले, गुन्ह्यात पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, आर्थिक देवाणघेवाण, अनैतिक संबंध आणि जमिनीचा वाद असे तीन निकष ठेवत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अप्पर अधीक्षक रितू खोखर याही तपासावर लक्ष ठेवून होत्या. त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली, कासेगाव, इस्लामपूर, कुरळप आणि उपअधीक्षक कार्यालयातील ३७ पोलिस आणि अधिकाऱ्यांची पाच पथके गुन्ह्याची उकल करण्यासाठी राबत होते. या सर्वांच्या सामूहिक शोधातून अनैतिक संबंधाची शक्यता समोर आल्यावर सुरेश ताटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही ताब्यात घेतले. हे तिघेही एका गॅस एजन्सीत कामाला होते.

ते म्हणाले, मृत पांडुरंग शिद आणि सुरेश ताटे हे नातेवाईक आहेत. त्यातून शिद व ताटे कुटुंबाचे येणे जाणे असायचे. पांडुरंग याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सुरेशला होता. त्यातून तो पत्नीला वरचेवर मारहाणही करत होता. त्याच्या संशयी स्वभावामुळे पहिली पत्नी सोडून गेली आहे. पांडुरंग शिद याचा खून करण्यासाठी सुरेश याने चार महिन्यांपूर्वी ५० हजार रुपये देत पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या होत्या, तसेच इस्लामपूर व आष्टा येथील काही गुंडांशी हत्यार देण्यासह एकाचा खून करण्यासाठी बोलणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे करत आहेत.

खुनासाठी पिस्तूल आणि ६ लाखांची सुपारी..!

सुरेश ताटे याने संशयाचे भूत डोक्यात शिरल्यावर सहा महिन्यांपासून पांडुरंग शिद याच्या खुनाचा कट रचण्यास सुरुवात केली होती. इस्लामपूर, आष्टा येथील गुंडांशी संपर्क केला होता. शेवटी स्वतःच पिस्तूल आणि गोळ्या खरेदी केल्या. स्वतःबरोबर काम करणाऱ्या दोघांना पिस्तूल पुरवून ते चालविण्याचे प्रशिक्षणही दिले, तसेच काम झाल्यावर ६ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.

दोन दिवस रेकी केली..!

मृत पांडुरंग शिद याचे शेत कासेगाव-वाटेगाव शिवेच्या रस्त्यावर आहे. रोज सकाळी शेतावर यायची त्याची सवय होती. त्यामुळे हल्लेखोरांनी पांडुरंग याच्या येण्याची वेळ आणि दबा धरून बसत हल्ला करण्याच्या जागेची रेकी केली होती. त्यानंतर, दोघांनी १६ ऑगस्टच्या सकाळी दुचाकीवरून येत असलेल्या पांडुरंग शिद याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता, समोर येऊन त्याच्यावर दोन गाेळ्या झाडल्या. डाेक्यात गाेळी बसल्याने शिद जागीच कोसळला. तिसरी गाेळी झाडताना लोड असलेले पिस्तूल अनलोड झाल्याने एक जिवंत काडतूस फायर न होता खाली पडले. ते घटनास्थळी पोलिसांना मिळून आले.

हत्यार पुरविणारा रडारवर..!

या गुन्ह्यात सुरेश ताटे याला पिस्तूल आणि गोळ्या पुरविणारा व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर आहे. त्याला ताब्यात घेतल्यावर या शस्त्र तस्करीची पाळेमुळे खणून काढली जाणार आहेत, तसेच ताटे याने खुनासाठी संपर्क केलेल्या इस्लामपूर आणि आष्ट्यातील गुंडांचीही चौकशी होणार आहे.

Web Title: Murder of six lakh betel nut on suspicion of immoral relationship, murder of moneylender in Kasegaon solved in just 36 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.