भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 03:10 PM2024-11-09T15:10:17+5:302024-11-09T15:21:28+5:30

 मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या वादातून मानेवर कुऱ्हाडीने घाव करत निर्घृण खून करण्यात आला.

murder of Sudhakar Khade, state president of BJP Startup India | भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा निर्घृण खून

भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा निर्घृण खून

मिरज - मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या वादातून मानेवर कुऱ्हाडीने घाव करत निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांवर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सुधाकर खाडे यांनी मिरजेत पंढरपूर रस्त्यावर राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन सचिन जगदाळे यांच्याकडून विकसनासाठी घेतली होती. मात्र, यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. यावरून लक्ष्मण चंदनवाले यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुधाकर खाडे, आप्पा ओतारी, ओंकार पवार यांच्यासह आठ ते दहा साथीदारांसोबत शनिवारी सकाळी या वादग्रस्त जागेवर कुंपण घालण्यासाठी गेले होते.

शेत जमिनीचे कब्जे धारक चंदनवाले कुटुंबातील महिलांसोबत सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी रागातून लक्ष्मण चंदनवाले यांचा मुलगा कार्तिक चंदनवाले याने मागून येऊन अचानक सुधाकर खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. मानेवर कुऱ्हाडीचा वर्मी घाव बसल्याने सुधाकर खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी खाडे यांच्या साथीदारांवर हल्ला चढविल्याने तेथे मोठा गोंधळ उडाला होता. खाडे यांना मिरजेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

खुनानंतर कार्तिक चंदनवाले या हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खाडे यांच्या खुनाच्या घटनेचे मोबाइलवर चित्रण झाले आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात कार्तिक चंदनवाले, लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह तीन महिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

२०१४ मध्ये निवडणूक लढवली होती

सुधाकर खाडे यांनी २०१४ मध्ये तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर अलीकडे त्यांनी भाजपत प्रवेश केला होता.

Web Title: murder of Sudhakar Khade, state president of BJP Startup India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.