मिरजेत पानटपरी फोडल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराचा खून, एकास अटक
By अविनाश कोळी | Published: September 17, 2022 07:08 PM2022-09-17T19:08:12+5:302022-09-17T19:08:49+5:30
पानटपरी फोडल्याचा जाब विचारला. यामुळे दोघांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. गणेश याने जिलानी यास छातीवर, पोटात, गुप्तांगावर ठोसे मारल्याने जिलानी बेशुद्ध होऊन तेथेच पडला.
मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक रस्त्यावर पानटपरी फोडल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार जिलानी इसामुद्दीन कुडचीकर (वय ४७, रा. बागलकोट, कर्नाटक) याचा छातीत, पोटात व गुप्तांगावर ठोसे मारून खून करण्यात आला. याप्रकरणी गणेश खन्ना नायडू (वय ३१, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) या संशयितास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. नायडू यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
रेल्वेस्थानक परिसरात गांजा विक्री करणारा गणेश नायडू व चोऱ्या, पाकीटमारी करणारा जिलानी कुडचीकर हे दोघे गुन्हेगार एकमेकांचे मित्र होते. रेल्वेस्थानक रस्त्यावर गणेश नायडू याची अनधिकृत पानटपरी असून, या टपरीवर जिलानी कुडचीकर हा नेहमी जात होता.
गुरुवारी रात्री पानटपरीजवळ येऊन गणेश याच्याकडून काही रक्कम घेऊन जिलानी कुडचीकर हा तेथून निघून गेला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे गणेश याची पानटपरी फोडण्यात आली. जिलानी याने पान दुकान फोडून रोख रक्कम व सिगारेट पाकीट चोरून नेल्याचा गणेश यास संशय होता.
पानटपरी फोडल्याने संतापलेला गणेश हा जिलानी याच्या मागावर होता. शुक्रवारी पहाटे जिलानी हा रेल्वेस्थानक रस्त्यावर एका मंदिरासमोर थांबल्याची माहिती मिळाल्याने गणेश नायडू तेथे गेला. गणेश याने जिलानी यास पानटपरी फोडल्याचा जाब विचारला. यामुळे दोघांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. गणेश याने जिलानी यास छातीवर, पोटात, गुप्तांगावर ठोसे मारल्याने जिलानी बेशुद्ध होऊन तेथेच पडला.
त्यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे जिलानी कुडचीकर याचा मृत्यू झाला. जिलानी कुडचीकर याच्या खूनप्रकरणी गणेश नायडू या सराईत गुन्हेगारास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस अधिक तपास करीत आहेत.