Sangli: झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून पत्नीचा खून, संशयित पती पोलिस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:17 IST2024-11-13T15:17:09+5:302024-11-13T15:17:41+5:30
कुरळप/ऐतवडे बुद्रूक : पत्नी झोपेत असतानाच पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे ...

Sangli: झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून पत्नीचा खून, संशयित पती पोलिस ठाण्यात हजर
कुरळप/ऐतवडे बुद्रूक : पत्नी झोपेत असतानाच पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिकुर्डे (ता. वाळवा) येथे घडला. खुनानंतर स्वत: पती पोलिस ठाण्यात हजर झाला.
कविता उत्तम बुरशे पाटील (वय ४२) असे मृत महिलेचे नाव तर संशयित उत्तम विष्णू बुरशे पाटील (वय ५२) असे पतीचे नाव आहे. कुरळप पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माने, राजेंद्र जाधव, दीपक खोमणे व फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला.
कविता हिचे चोवीस वर्षांपूर्वी उत्तम बुरशे पाटील यांच्याशी विवाह झाला होता. उत्तम एका साखर कारखान्यात लॅब विभागात कामाला आहे. त्यांना एक मुलगी, मुलगा असा परिवार आहे. मुलगी डिप्लोमाला, तर मुलगा डिग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. ही दोन्ही मुले बाहेरगावी राहायला असल्याने सध्या कविता व उत्तम हे दोघेच चिकुर्डे येथे वास्तव्यास आहेत. यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते.
उत्तम यांच्या स्वभावात बदल होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी कविता या करंजवडे या त्यांच्या माहेरी निघून गेल्या होत्या. मात्र, उत्तम याने मी परत भांडण करणार नाही, असे सांगून कविता यांना मागील महिन्यात घरी घेऊन आला होता. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यामुळे उत्तम याने मंगळवारी पहाटे कविता या झोपेत असतानाच घराबाहेरील मोठा दगड आणून तिच्या डोक्यात घालून खून केला व घरात नळाचे पाणी भरून व अंघोळ करून भावकीतील काही लोकांना खून केल्याचे सांगत कुरळप पोलिसांत हजर झाला.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण व सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत.
हुशार मुले आईविना पोरकी..
कविता व उत्तम यांची दोन्ही मुले हुशार असल्याने शासकीय कोट्यातून मुलगीला डिप्लोमाला प्रवेश मिळाला आहे, तर मुलगा कोल्हापुरातील एका कॉलेजमध्ये डिग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मंगळवारी मुलीचा पेपर असल्याने तिला या खुनाच्या घटनेची माहिती दिली नव्हती. मात्र, या घटनेमुळे चिकुर्डेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.