सांगलीतील खूनप्रकरण : हाताच्या ठशावरुन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:13 PM2018-10-05T15:13:22+5:302018-10-05T15:15:18+5:30
सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळख पटली नसल्याने पोलिसांचा पुढील तपास थांबला आहे.
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळख पटली नसल्याने पोलिसांचा पुढील तपास थांबला आहे.
रविवारी दि. ३० सप्टेंबर रोजी मृत तरुणावर काठी व दगडाने हल्ला करुन खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विजयनगरमधील यशवंतराव होळकर चौकातील ह्यअथर्वह्ण बंगल्यासमोर फेकून दिला होता. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.
मृतदेहाची ओळख पटेल, असे काहीच सापडले नव्हते. केवळ राखी बांधलेला एक धागा हातात होता. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण केले. श्वान पर्ल हॉटेलपासून दोनशे मीटर अंतर व विश्रामबाग रेल्वे स्थानकापर्यंत गेले. याठिकाणी मृताचे रक्ताचे डाग सापडले. यावरुन त्याला दोन ते तीन ठिकाणी मारहाण केल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेहाच्या छायाचित्रावरुन त्याची सांगली, कोल्हापूर, सातारासह कर्नाटकात ओळख पटविण्याचा प्रयत्न केले. या वर्णनाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे का, याची तपासणी करण्यात आली. पण काहीच सुगावा लागला नाही. प्रसारमाध्यमातूनही अनोळखी तरुणाच्या खुनाचे वृत्त दोन-तीन दिवस प्रसिद्ध झाले. हे वाचूनही कोणी पुढे आली नाही. त्यामुळे मृत तरुण परराज्यातील असावा, अशीही शक्तता वर्तविली जात आहे.