कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:44+5:302021-01-25T04:26:44+5:30
कुपवाड : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी ऊर्फ शुभम् पारसमल जैन (वय २५, रा. खारे मळा, कुपवाड) याचा घरगुती कारणातून ...
कुपवाड : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी ऊर्फ शुभम् पारसमल जैन (वय २५, रा. खारे मळा, कुपवाड) याचा घरगुती कारणातून सख्ख्या भावाने पाठलाग करून डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजता राणा प्रताप चौकात घडली. कुपवाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद झाली असून, पोलिसांनी हल्लेखाेर शशांक जैन याला ताब्यात घेतले आहे.
सराईत गुन्हेगार सनी ऊर्फ शुभम् जैन व त्याचा भाऊ शशांक जैन या दोघांत शनिवारी रात्री घरगुती कारणातून वाद झाला. यातून चिडून सनी याने घरातील तलवार घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून घाबरलेला शशांक जीव वाचविण्यासाठी घरातून बाहेर पळू लागला. सनी याने हातात तलवार घेऊन भावाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करताना रस्त्यावरील दगडाची ठेच लागून सनी रस्त्यावर पडला. ही संधी साधून शशांक याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून सनीच्या डोक्यात घातला. दगडाचा वर्मी घाव बसल्याने सनी जागीच ठार झाला.
घटनेची माहिती काही नागरिकांनी कुपवाड पोलिसांना दिली. तातडीने सहायक निरीक्षक नीरज उबाळे व पथक घटनास्थळी धावले. घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी संशयित शशांक जैन यास ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.
सनी जैन हा सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी ताे घरफोडी व दहशत माजविण्याच्या प्रकरणातून जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो दररोज घरातील व्यक्तींशी वाद घालत होता. तसाच प्रकार शनिवारी रात्री त्याने पुन्हा घरात सुरू केला. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तो ऐकत नसल्याने अखेर भावाने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा काटा काढला. सनी याच्यावर कुपवाड पोलिसांत घरफोडी, मारामारी, चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
फोटो : २३०१२०२१ सनी जैन