विवाहितेवर अत्याचार करून विहिरीत फेकून देऊन खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:48+5:302021-01-23T04:26:48+5:30
फोटो : २२०१२०२१ धनाजी खोत फोटो : २२०१२०२१ एसएएन०१ : खुनाच्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी रुपाली खोत यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ ...
फोटो : २२०१२०२१ धनाजी खोत
फोटो : २२०१२०२१ एसएएन०१ : खुनाच्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी रुपाली खोत यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक होऊन देववाडी ग्रामपंचायतीजवळ सकाळी जमा झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : देववाडी (ता. शिराळा) येथे उसाच्या शेतात पाणी पाजण्यास गेलेल्या रुपाली मारुती खोत (वय ३५) या विवाहितेवर २२ वर्षीय तरुणाने अत्याचार करून विहिरीत फेकून दिल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. याप्रकरणी धनाजी ऊर्फ निवास पंडित खोत या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
मांगले-चिकुर्डे रस्त्यावर देववाडीच्या शिवारात गुरुवारी दुपारी रुपाली खोत शेतात पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी संशयित धनाजीने त्यांना एकटीला गाठले. लादेवाडी (ता. शिराळा) हद्दीतील नामदेव खोत यांच्या विहिरीशेजारी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करून विहिरीत ढकलून दिले. आई घरी आली नाही म्हणून सायंकाळी सहाच्या सुमारास मृत महिलेचा मुलगा अविनाश शेतात गेला होता. त्यावेळी धनाजी विवस्त्रावस्थेत तेथे दिसला. अविनाशला पाहताच धनाजीने उसाच्या शेतात पळ काढला. अविनाशने घरी येऊन वडील आणि कुटुंबीयांना सांगितल्यानंतर शिराळा पोलिसांना घटनेची कल्पना देण्यात आली. पोलिसांनी धनाजीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह टाकलेल्या विहिरीत रात्रभर पाणी उपसण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी पाणी कमी झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
रुपाली खोत यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक होऊन देववाडी ग्रामपंचायतीजवळ सकाळी जमा झाले होते. संशयिताला ताब्यात द्या, त्याच्या कुटुंबीयांना गावबंदी करा, असा पवित्रा घेऊन स्थानिक नेत्यांकडे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी आग्रह धरला. सुमारे दोन तास तणाव होता. अखेर गावसभा बोलावण्यात आली. संशयितासह त्याच्या कुटुंबालाही शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्याचा ठराव सभेत झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी येईपर्यंत उठायचे नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी कुटुंबीयांना फिर्याद देण्यास सांगितल्यानंतर तणाव निवळला. रुपाली यांचे पती मारुती यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, शवविच्छेदनात रुपाली यांच्या अंगावर नखाचे ओरखडे असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पाण्यात पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी झुबेर मोमीन यांनी वर्तविला. दुपारी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकट
... तर रुपाली यांचा जीव वाचला असता
रुपाली खोत कष्टाळू होत्या. त्यांना अविनाश (वय १५) व संचिता (१३) अशी दोन मुले आहेत. पती मारुती यांच्यासह मुलांना या घटनेचा धक्का बसला आहे. संशयित धनाजी खोत याने यापूर्वी महिलांची छेडछाड केल्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. मात्र, प्रत्येकवेळी ते प्रकरण मिटवण्यात आले. कोणतेही प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. त्याच्यावर त्याचवेळी कारवाई झाली असती, तर रुपाली यांचा जीव वाचला असता, अशी चर्चा गावात सुरू आहे.