तीस रुपयांसाठी तरुणाचा मित्राकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:25+5:302021-05-20T04:28:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत तालुक्यातील तोळबळवाडी (मुचंडी) येथील तरुणाचा ३० रुपये मागितल्याने मित्रानेच गळा आवळून, लाथाबुक्क्यांनी मारहाण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यातील तोळबळवाडी (मुचंडी) येथील तरुणाचा ३० रुपये मागितल्याने मित्रानेच गळा आवळून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला. अरुण शामू मलमे (वय २०, रा. तोळबळवाडी, मुचंडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्याचा मित्र रमेश फकिराप्पा पाटोळे (रा. तोळबळवाडी) याच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूर्वभागातील तोळबळवाडी येथे अरुण मलमे शेती करतो. सुधीर बिराप्पा पाटोळे व रमेश फकिराप्पा पाटोळे हे दोघे त्याचे मित्र आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता अरुण व सुधीर एका दुचाकीवरून, तर रमेश दुसऱ्या दुचाकीवरून गेले होते. दिवसभर दरीबडचीत तिघांनी शिंदी प्याली. शिंदीचे ३० रुपये अरुणने दिले होते. ते पैसे गावात गेल्यावर देतो, असे रमेशने सांगितले होते.
सायकांळच्या सातच्या सुमारास तिघे कन्नड शाळेजवळ थांबले होते. अरुणने रमेशकडे तीस रुपयांची मागणी केली. शाळेजवळचे दुकानदार अंकुश हणमंत पाटोळे यांच्याकडून रमेशने ३० रुपये मागून घेतले. पैसे देण्यासाठी रमेेश शाळेजवळ गेला. मात्र पैसे मागितल्याचा त्याला राग आला. तेथे दोघांत कडाक्याचे भांडण झाले.
रमेशने अरुणचा गळा धरून लाथाबुक्क्यांनी मारून ढकलून खाली पाडले. तो खाली पडल्यानंतर रमेश त्याच्या छातीवर बसला. छातीवर जोराचे ठोसे मारले. त्यामध्ये अरुण गंभीर जखमी झाला. माणसे जमा होताच रमेश पळून गेला.
मृताचे चुलते सदाशिव यांना एकाने दूरध्वनी करून अरुण शाळेजवळ पडल्याचे सांगितले. सदाशिव यांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली. घटनास्थळी गेला असता अरुण निपचित पडला होता. जत येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. वडिलांनी फिर्याद दिली आहे.
संशयिताचा शोध तपास पथक घेत आहे.
चौकट
एकुलता मुलगा
अरुण वडील, आई, बहिणीसमवेत राहत होता. त्याला तीन विवाहित बहिणीही आहेत. घरात कर्ता असणाऱ्या एकुलत्या मुलाचा खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.