कापूसखेडमध्ये महिलेवर खुनी हल्ला
By Admin | Published: January 2, 2017 12:04 AM2017-01-02T00:04:14+5:302017-01-02T00:04:14+5:30
गंभीर जखमी : छेडछाडीचा जाब विचारल्याने चौघांचे कृत्य
सांगली : मुलीच्या छेडछाडीबद्दल जाब विचारणाऱ्या सुनीता रामचंद्र चव्हाण (वय ४०, रा. कापूसखेड, ता. वाळवा) या महिलेवर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला. हल्लेखोर अमोल सदाशिव कोळी व त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. शुक्रवारी ही घटना घडूनही इस्लामपूर पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही.
सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर, तब्बल ४२ तासांनंतर रविवारी दुपारी पोलिसांनी जखमी चव्हाण यांचा जबाब नोंदवून घेतला. हल्ल्यात जखमी झालेल्या सुनीता चव्हाण यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुुरू असून, त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चव्हाण यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. ८० वर्षांची आई व मुलीसोबत त्या राहतात. शुक्रवारी रात्री त्यांची मुलगी दूध संकलन केंद्रात दूध घालण्यासाठी गेली होती. त्यावेळी संशयित अमोल कोळी व त्याच्या तीन साथीदारांनी तिची छेड काढली. मुलीने घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. यापूर्वीही संशयितांनी अनेकदा त्यांच्या मुलीची छेड काढली असल्याने, सुनीता चव्हाण याचा जाब विचारण्यासाठी संशयितांकडे गेल्या होत्या. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
पोलिसांत तक्रार करतो, असे चव्हाण यांनी म्हणताच संशयितांना राग आला. त्यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने हल्ला केला. त्यात चव्हाण गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी व स्थानिक पोलिसांनी इस्लामपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. तरीही शुक्रवारी रात्रभर व शनिवारी संपूर्ण दिवसभरात इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे चव्हाण यांचा जबाब घेण्यासाठी एकही पोलिस फिरकला नाही. परिणामी, या कुटुंबास सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेची मदत घ्यावी लागली.
संघटनेच्या अध्यक्ष लीलाताई जाधव, चंपाताई जाधव, जयश्री सावंत, कमल शिर्के, मंगल पाटील, गीता ठक्कर, आशा फडणवीस, सरिता कदम व भगिरथी दळवी यांनी रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना भेटण्यासाठी पोलिस मुख्यालय गाठले; पण शिंदे यांची भेट झाली नाही. पोलिस नियंत्रण कक्षात त्यांनी निवेदन देऊन, चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. त्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी पळापळ केली व तब्बल ४२ तासांनंतर चव्हाण यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू ठेवली. (प्रतिनिधी)
३७० टाके पडले
संशयितांनी पहिल्यांदा चाकूहल्ला केल्यानंतर सुनीता चव्हाण यांनी प्रतिकार केला. त्यामुळे संशयितांनी पोटावर, पायावर, डोक्यावर, मानेवर असे सात ते आठ वार केले. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्यानंतर संशयित पळून गेले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया केली. यामध्ये त्यांना झालेल्या जखमेला सुमारे ३७० टाके पडले आहेत. अजूनही त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.