सांगलीतील शिपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजप नेत्यावर खुनी हल्ला, ..अन् भाजप नेता बचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:41 PM2022-11-14T16:41:18+5:302022-11-14T17:09:19+5:30

शिपूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या गटात ग्रामपंचायत निवडणुकीपासून वाद

Murderous attack by NCP leader on BJP leader in Shippur in Sangli | सांगलीतील शिपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजप नेत्यावर खुनी हल्ला, ..अन् भाजप नेता बचावला

सांगलीतील शिपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजप नेत्यावर खुनी हल्ला, ..अन् भाजप नेता बचावला

Next

मिरज : जागेच्या वादातून शिपूर (ता. मिरज) येथे राष्ट्रवादी युवकचा मिरज तालुकाध्यक्ष शिवाजी महाडिक याने गावातील भाजप नेते रणजित देसाई यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखत तलवारीने हल्ला केला. यावेळी समर्थकांनी प्रसंगावधान राखत त्यास रोखल्याने देसाई बचावले. याप्रकरणी शिवाजी महाडिक याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर महाडिक फरारी झाला आहे.

शिपूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या गटात ग्रामपंचायत निवडणुकीपासून वाद आहे. येथील सरपंच राष्ट्रवादीच्या महाडिक गटाच्या असून त्यांनी सत्तेचा गैरवापर करून बोगस दस्ताद्वारे जागा बळकावल्याची तक्रार रणजित देसाई यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेत या तक्रारीच्या सुनावणीवेळी महाडिक व देसाई यांनी परस्परांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रविवारी सकाळी महाडिक व देसाई यांच्यातील वादाचे पर्यवसान मारामारीत झाले.

रागाच्या भरात शिवाजी महाडिक घरातून एका हातात तलवार व दुसऱ्या हातात रिव्हॉल्व्हर घेऊन देसाई यांच्या अंगावर धावून आला. यावेळी तेथे असलेल्या मधुकर देसाई, नितीन देसाई, बाळासाहेब सूर्यवंशी यांनी त्यास अडवले. मात्र, त्यांना न जुमानता महाडिक याने रणजित देसाई यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देसाई यांचा पुतण्या अवधूत देसाई याने तलवार पकडल्याने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला तलवार लागून जखम झाली.

यावेळी पोलिस पाटील राजेश पाटील व अन्य ग्रामस्थांनी महाडिक याच्याकडील तलवार, रिव्हॉल्व्हर काढून घेतले. दोन्ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. गावात पोलिस येताच शिवाजी महाडिक याने गावातून पलायन केले. याबाबत रणजित लालासाहेब देसाई (वय ४६) यांनी शिवाजी महाडिक याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. फरारी शिवाजी महाडिक याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

रिव्हॉल्व्हर विनापरवाना?

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीच्या घटनेमुळे शिपूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जप्त केलेले रिव्हॉल्व्हर विनापरवाना असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Murderous attack by NCP leader on BJP leader in Shippur in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.