प्रेम केलं, कुटुंबाविरोधात जाऊन लग्नही केलं, मात्र नंतर घडलं भयंकर; पतीकडून तरुणीवर खुनी हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 08:41 PM2024-08-07T20:41:05+5:302024-08-07T20:41:48+5:30
कौटुंबिक वादातून कृत्य; हल्ल्यानंतर पती मोपेड टाकून पसार
घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील कॉलेज कॉर्नर परिसरात महाविद्यालयाच्या दारात प्रांजल राजेंद्र काळे (वय १९, रा. वासुंबे, ता. तासगाव) या तरूणीवर कौटुंबिक वादातून पती संग्राम संजय शिंदे (वय २५, रा. सावंतपूर वसाहत, ता. पलूस) याने कोयत्याने वार केला. सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर पती संग्राम मोपेड, कोयता टाकून पळून गेला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध उशिरा खुनी हल्ला आणि ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संग्राम शिंदे हा ट्रक चालक म्हणून काम करतो. प्रांजल आणि संग्रामची ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ३ डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहानंतर प्रांजल तीन महिने सासरी राहिली. परंतू संग्रामच्या घरातील लोकांनी तिला स्विकारले नाही. त्यामुळे वारंवार वाद व्हायचा. त्यामुळे ती माहेरी येऊन राहिली. माहेरी राहिल्यानंतर संग्राम तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता. संग्राम धमकावत असल्यामुळे त्याच्याविरूद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
प्रांजल ही सांगलीत बी.कॉम. भाग २ मध्ये शिकत होती. सकाळी ती बसथांब्यावर उतरून कॉलेजकडे येत होती. त्यावेळी संग्राम मोपेडवरून तिच्या आडवा आला. महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील गेटच्या बाहेर दोघेजण बोलत थांबले.
संग्राम तिला घराकडे चल म्हणून विनंती करत होता. परंतू प्रांजलने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संग्राम चिडला. त्याने लपवलेला कोयता बाहेर काढला. तेव्हा प्रांजल पळून जाऊ लागली. परंतू त्याने तिला पकडले. झटापटीत ती खाली पडली. तेव्हा तुझा हातच तोडून टाकतो असे म्हणून डाव्या हातावर वार केला. खोलवर वार झाल्यानंतर प्रांजल मदतीसाठी ओरडू लागली. तेव्हा संग्राम तेथून पळून जाऊ लागला. मोपेड सुरू न झाल्यामुळे जागेवरच सोडून, कोयता टाकून पळाला.
हल्ल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली. तेव्हा एका रिक्षा चालकाने प्रांजलला रिक्षात बसवून तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यानंतर तिला शस्त्रक्रियेसाठी सेवासदनमध्ये दाखल केले. तेथे शस्त्रक्रियेनंतर सायंकाळी जबाब नोंदवला. रात्री उशिरा खुनी हल्ला आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
परिसरात घबराट
कॉलेज कॉर्नर परिसरात तरूणीवर हल्ला झाल्याची माहिती सर्वत्र पसरताच विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. थोड्या वेळानंतर कौटुंबिक वादातून पतीने हल्ला केल्याचे समजले. अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे आदींनी भेट दिली.
हल्लेखोर पतीचा शोध
खुनी हल्ल्यानंतर पळालेल्या पती संग्राम शिंदे याचा पोलिस शोध घेत आहेत. शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. त्याच्या नातेवाईकांना बोलवून पोलिसांनी संग्रामबाबत चौकशी केली. तो चालक म्हणून काम करत असल्यामुळे कोठेतरी दूरवर गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.