सांगलीत गुंड म्हमद्याच्या साथीदारावर खुनी हल्ला; शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य

By घनशाम नवाथे | Published: July 6, 2024 09:19 PM2024-07-06T21:19:27+5:302024-07-06T21:19:43+5:30

एकाच कुटुंबातील सहाजणांवर गुन्हा

Murderous attack on gangster Mhamdya's accomplice in Sangli Act out of anger at abuse | सांगलीत गुंड म्हमद्याच्या साथीदारावर खुनी हल्ला; शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य

सांगलीत गुंड म्हमद्याच्या साथीदारावर खुनी हल्ला; शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य

सांगली : गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार आणि ‘मोका’ तील संशयित मोहसीन आलम पठाण (वय ३२, रा. कत्तलखाना रस्ता, गणेशनगर) याने एका कुटुंबातील सदस्यांना धमकावून शिवीगाळ केल्यामुळे त्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी रात्री शामरावनगर येथे हा प्रकार घडला. हल्ल्यात मोहसीन गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सलमान रियाज मुजावर, सलमानची आई, इरफान मुजावर, आयान मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफानचे वडिल रियाज (सर्व रा. शामरावनगर, सांगली) यांच्याविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहसीन पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुंड म्हंमद्या नदाफच्या टोळीत तो सहभागी होता. त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरूध ‘मोक्का’ ची कारवाई झाली होती. त्यात तो जामिनावर बाहेर आला आहे. मूळ कोल्हापूर शहरात राहण्यास आहे. गणेशनगर येथे त्याची आई राहते. शुक्रवारी तो सांगलीत आला होता. सायंकाळच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील एकता चौकात थांबला होता. त्याने मित्र सलमान याला फोन केला. त्यावेळी सलमान याच्या आईने फोन घेतला. सलमानच्या आईने त्याला फोन का केलास म्हणत शिवीगाळ केली. त्याचा मोहसीनला राग आला. जाब विचारण्यासाठी तो रात्री सलमानच्या घरी कोयता घेऊन गेला.

मोहसीनने घरी येऊन शिवीगाळ करत जाब विचारला. घरात सलमान, सलमानची आई, भाऊ आयान मुजावर, चुलत भाऊ इरफान मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफानचे वडिल रियाज होते. संशयितांनी त्याला घराबाहेर नेले. तेथे जोरदार वादावादी झाली. तेव्हा संशयितांनी चाकू, एडक्याने मोहसीनच्या डोक्यात वार केला. वर्मी घाव बसल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर तो पळत सिव्हील हॉस्पिटल परिसरात धावत गेला.

सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अकराच्या सुमारास एका इमारतीत लपून बसलेल्या मोहसीनला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्या डोक्यात, गालावर वार झाले आहेत. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यावेळी सिव्हील परिसरात मध्यरात्रीनंतर गर्दी जमली होती. पोलिसांनी जखमी मोहसीनचा जबाब घेऊन सहाजणांविरूद्ध बीएनएस १०९ आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोहसीनवरही खुनी हल्ल्याचा गुन्हा
खुनी हल्ल्यातील जखमी मोहसीन याच्याविरूद्धही खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान रियाज मुजावर याने याबाबत फिर्याद दिली आहे. रात्री साडे आठच्या सुमारास मोहसीन घरी आला होता. त्याने फोन का उचलत नाही, माझ्याबरोबर बोलत का नाहीस, तुला जीवंत ठेवत नाही असे म्हणत कोयत्याने भुवईवर, डोक्यात, हातावर वार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Murderous attack on gangster Mhamdya's accomplice in Sangli Act out of anger at abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली