Sangli- मिरजेत महिलेवर कुऱ्हाडीने खुनी हल्ला, हल्लेखोरास जमावाचा चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:13 PM2023-04-10T17:13:35+5:302023-04-10T17:13:59+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जुनेद मुश्रीफ यांच्याविरुद्ध राधिका कांबळे हिने यापूर्वी पोलिसांत तक्रार दिली होती
मिरज : मिरजेत पोलिसांत तक्रार केल्याच्या कारणावरून म्हाडा काॅलनीत दोघांनी भरदिवसा सर्वांसमोर महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी राधिका कांबळे (वय २५, रा. म्हाडा काॅलनी, मिरज) या महिलेस उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी शाकिर शेख या एका आरोपीस पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
जुनेद रफीक मुश्रीफ व शाकिर जलील शेख हे दोघे रविवारी दुपारी राधिका कांबळे यांच्या घराजवळ आले. जुनेद मुश्रीफ याने कुऱ्हाडीने डोक्यात वार केले. राधिका कांबळे यांना गंभीर जखमी केले. यावेळी कॉलनीतील नागरिकांनी शाकिर शेख याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जुनेद मुश्रीफ हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तातडीने घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी शाकिर यास जमावाच्या ताब्यातून सोडवले. डोक्यात कुऱ्हाडीच्या घावामुळे गंभीर जखमी झालेल्या राधिका कांबळे यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
हा हल्ला करताना हल्लेखोरांचे मोबाइल कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जुनेद मुश्रीफ यांच्याविरुद्ध राधिका कांबळे हिने यापूर्वी पोलिसांत तक्रार दिल्याने जुनेद मुश्रीफ याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या कारणाने जुनेद व त्याचा साथीदार शाकिर याने तिच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे. घटनास्थळी पडलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली. शहर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून शाकिर शेख यास अटक केली आहे.